कळंबा कारागृहाची विभागीय चौकशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील बरॅकमध्ये कैद्यांकडून झालेल्या मोबाइल वापराची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. त्यासाठी कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कैद्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच चौकशीला सुरवात होईल, असे कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सांगितले.

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील बरॅकमध्ये कैद्यांकडून झालेल्या मोबाइल वापराची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. त्यासाठी कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कैद्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच चौकशीला सुरवात होईल, असे कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सांगितले.

कळंबा कारागृहातील तिघे कैदी मोबाइल वापरत असल्याचे 1 नोव्हेंबरला प्रशासनाच्या निदर्शनास आले. याची तातडीने दखल घेत प्रशासनाने संबधित तिघांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मंदार कृष्णदेव कदम, सुमित प्रकाश गवळी आणि दशरथ पांडुरंग माळी अशी त्यांची नावे आहेत. यापैकी काल मंदार कदम याला पोलिसांनी अटक केली. इतर दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांनी गृहमंत्रालयाशी पत्रव्यवहारही केला आहे. कळंबा कारागृहात मोबाइल सापडल्याने पुन्हा एकदा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या पाच कैद्यांनी कळंबा कारागृहात 22 नोव्हेंबर 2015 रोजी चूल पेटवून पार्टी केली होती. त्यानंतर त्याची मोबाइलवर चित्रफीत काढून ती व्हायरल केली होती. याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली तर तिघा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता बरॅकमध्ये कैद्यांकडून वापरल्या गेलेल्या मोबाइलच्या प्रकाराची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची विभागीय चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्याबाहेरील स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केली गेली आहे. त्यांच्याकडून येत्या दोन दिवसांत चौकशीला सुरवात होणार आहे. कोणत्या बरॅकमध्ये हा प्रकार घडला? मोबाइल कोणी आणला, तो कोणाचा आहे, या मुद्द्यांवर ही चौकशी होणार आहे. संबंधित अधिकारी व बरॅकमधील कैद्यांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेतला जाणार आहे. चार ते पाच दिवस ही चौकशी प्रक्रिया सुरू राहण्याची शक्‍यता आहे. चौकशीनंतर वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार आहे.

दोषींची गय नाही...
विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानतंर आपल्याकडे त्याचा अहवाल येणार आहे. या अहवालाद्वारे सत्य समोर येणार आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही.
- स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक

Web Title: probe into mobile use in kalamba jail