दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी वणवण 

तात्या लांडगे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

सोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी एसएडीएम ऐवजी स्वावलंबन पध्दत सुरु केली आहे. त्याचा सोयीचा अर्थ काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील 64 हजारजण प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असल्याचे अपंग आयुक्‍त कल्याण विभागाकडून सांगण्यात आले. 

राज्यातील दिव्यांग व्यक्‍तीला कोणत्याही जिल्ह्यातून प्रमाणपत्र काढता यावे, या उद्देशाने सरकारने स्वावलंबन पध्दत सुरु केली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची जबाबदारी जिल्हा अथवा उपजिल्हा रुग्णालयांकडे तर महापालिका क्षेत्रातील जबाबदारी तेथील संबंधित रुग्णालयाकडे देण्यात आली आहे. शहरातील काही भागातील दाखले देण्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयच नाही तर महापालिकेच्या एकाही दवाखान्यात दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या तज्ज्ञांची पदे मंजूर नाहीत. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्हा अथवा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणि महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्‍टारांची पदे मंजूर नाहीत तर प्रमाणपत्र द्यायचे कसे, असा प्रश्‍न संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, करमाळा व अकलूज येथे उपजिल्हा रुग्णालये आहेत. परंतु, त्याठिकाणी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञांच्या जागाचा मंजूर नाहीत. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयदेखील नाही. आता नव्या शासन निर्णयामुळे अपंग व्यक्‍तींना प्रमाणपत्रासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. 
- डॉ. सुमेध अंदूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक 

राज्याची स्थिती 
जिल्हा ग्रामीण रुग्णालये - 34 
उपजिल्हा ग्रामीण रुग्णालये - 90 
विशेष तज्ज्ञांची रिक्‍तपदे - 3,926 
अपंग प्रमाणपत्रासाठी वेटिंग- 63,953

Web Title: Problem face for getting handicapped certificate