पावसाअभावी कांदा लागवडीत विघ्न

The problem of onion cultivation due to lack of rain
The problem of onion cultivation due to lack of rain

सोलापूर : जिल्ह्यात यंदा पाऊस खूपच कमी झाला आहे. त्याचा सर्वच पिकावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात खरीप कांद्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बी टाकले होते. त्याची आता रोपे झाली आहेत. ती रोपे लागवडी योग्य झाली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने कांद्याच्या लागवडीत विघ्न येत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कांदा लागवडीत उत्तर सोलापूर तालुक्‍याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये कांद्याची लागवड केली जाते. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामाच्या मधल्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते.

खरीप हंगामात कांदा लागवड करायचा झाल्यास त्यासाठी मे-जूनच्या दरम्यान बी टाकावे लागते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी बी टाकले होते. पावसाळ्याच्या सुरवातीला झालेल्या पावसाच्या जोरावर कांद्याची लागवड करायची असा त्यामागचा उद्देश होता. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचा हा उद्देश सफल झाला होता. मात्र, यंदा जूनच्या सुरवातीला पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. कांद्याची रोपे आता लागवडी योग्य झाली आहेत. मात्र, पाऊसच गायब झाल्याने कांद्याच्या लागवडीपुढे विघ्न उभे राहिले आहे. जिल्ह्यात जेमतेम 50 टक्केच पाऊस झाला आहे. पण हा पाऊस कांदा लागवडीला पुरेसा नाही. त्यामुळे रोपे लागवडीला येऊनही पाणी नसल्याने कांद्याची लागवड खोळंबली आहे. 

रोपे लागवडीच्या पुढे जाऊ लागल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. वेळेवर पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी कांद्याचे बी टाकले होते. पण, बेभरवशाच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. रिमझिम झालेल्या पावसावर केलेली कांदा लागवड जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तुषार सिंचनाचा आसरा घ्यावा लागत आहे.

मोहोळ, माळशिरस, मंगळवेढ्यात लागवडच नाही 
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ, माळशिरस व मंगळवेढा या तीन तालुक्‍यात कांद्याची एक एकरही लागवड झाली नसल्याचे स्पष्ट होते. मागील वर्षी मात्र या तीनही तालुक्‍यामध्ये कांद्याची लागवड झाली होती. यंदा मात्र पाऊस नसल्याने लागवड झालेली नाही.

कांदा लागवडीची जिल्ह्यातील स्थिती हेक्‍टरमध्ये कंसात मागील वर्षीची स्थिती 
उत्तर सोलापूर-1494 (478), दक्षिण सोलापूर-1190 (367), बार्शी-823 (244), अक्कलकोट-155 (1675), मोहोळ-0 (540), माढा-407 (574), करमाळा-278 (76), पंढरपूर-88 (463), सांगोला-14 (35), माळशिरस-0 (30), मंगळवेढा-0 (25), एकूण-4449 (4507) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com