खंडाळीत गावात दोन समाजात तणाव 

राजकुमार शहा
गुरुवार, 17 मे 2018

दोन समाजाच्या फलक काढण्यावरून खंडाळी (ता. मोहोळ) येथे मोठा तणाव निर्माण झाला असून गावातील महापुरुषांच्या नावे असलेला कट्टा व झेंड्याच्या खांबाचे नुकसान केल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकाराने संपूर्ण खंडाळी गाव बंद असून गावाला पोलिस छावणीचे रूप आले आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. 
 

मोहोळ (सोलापूर) - दोन समाजाच्या फलक काढण्यावरून खंडाळी (ता. मोहोळ) येथे मोठा तणाव निर्माण झाला असून गावातील महापुरुषांच्या नावे असलेला कट्टा व झेंड्याच्या खांबाचे नुकसान केल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकाराने संपूर्ण खंडाळी गाव बंद असून गावाला पोलिस छावणीचे रूप आले आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. 

सकाळी झालेल्या हुल्लडबाजी व किरकोळ दगडफेकीत मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड जखमी झाले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर, निखिल पिंगळे, तहसीलदार किशोर बडवे, राज्य मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र गायकवाड, भाजपचे तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी खंडाळीला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली व शांततेचे आवाहन केले.

रात्री तोडफोडीचा सर्व प्रकार कर्तव्यावर असलेल्या पोलिसासमोर झाला असून त्यांना निलंबित करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. सध्या खंडाळीत राज्य राखीव व जलद प्रतिसाद दलाच्या तुकड्या व मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. खंडाळी येथील चौकात महापुरुषाचा डिजिटल फलक लावला होता, तो काढा अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिसाकडे केली तर त्याच ठिकाणी दुसऱ्या महापुरुषाचा फलक लावण्यात आला होता. महापुरुषाचा फलक जीर्ण झाल्यामुळे बुधवारी रात्रीच्या वादळाने तो फाटला. मात्र तो गावकऱ्यांनीच फाड़ला असा आरोप एका गटाच्या युवकांनी केला. अशी कृत्ये करणाऱ्यांना रात्रीच पोलीसांनी अटकाव करून त्यांच्यावर कारवाई केली असती तर हा आजचा प्रकार घडला नसता असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी गावातील सर्वच फलक काढून टाकले आहेत. ज्या फलकावरुन वाद झाला तो फलक सहा मे पर्यंत काढतो असे आश्वासन पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी खंडाळी ग्रामस्थांना बैठकीत दिले होते. मात्र ता काढलाच नाही, त्यामुळे खंडाळीकरांचा पोलिसांविरोधात मोठा रोष आहे.

Web Title: problem in two community