परप्रांतीय मजुरांनी पाठ फिरवल्याने द्राक्षबागायतदारांची अडचण

सचिन निकम 
Monday, 7 September 2020

पावसाच्या उघडीपीमुळे द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांची बागेची कामे लांबणीवर पडली आहेत. द्राक्ष बागायतदारांची हंगामाची तयारी सुरू आहे.

लेंगरे : पावसाच्या उघडीपीमुळे द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांची बागेची कामे लांबणीवर पडली आहेत. द्राक्ष बागायतदारांची हंगामाची तयारी सुरू आहे. परंतु कोरोनाच्या धास्तीने परप्रांतीय मजूर गावाकडे गेल्याने द्राक्षबागातील कामासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिसरातील देविखिंडी, माहुली, पळशी, बलवडी, मांगरूळ या द्राक्षपट्ट्यात बिहार, उत्तर प्रदेशातील मजूर दरवर्षी द्राक्षबागांतील कामासाठी येतात.

मात्र कोरोनामुळे मजुरांनी या भागाकडे पाठ फिरवल्याने द्राक्षबागायतदारांची अडचण झाली आहे. द्राक्ष बागाच्या छाटणीपासून द्राक्षकाढणीपर्यंत सर्व कामे हे मजुर करतात. बिहार, उत्तर प्रदेशसह विदर्भातील नाशिक जिल्ह्यातून येणारे मजुर देविखिंडी, कलेढोण भागात आले आहेत. द्राक्षबागांची ही प्रमुख कामे स्थानिक मजुरांकडूनही करुन घेतली जातात. मात्र अव्वाच्या सव्वा मजुरीमुळे परवडत नसल्याने परप्रांतिय मजुरांना द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांकडून मागणी आहे. या परप्रांतीय मजुरांची जुळवाजुळव करण्याचे काम ठेकेदार करतात. बाहेरुन येणाऱ्या मजुरांची द्राक्ष बागायतदारांना सांगड घालण्याचे काम हे ठेकेदार करतात. बाहेरील परप्रांतातून येणारे हे मजुर एकरी 40 ते 45 हजारांपर्यंत ठेका पद्धतीने ठरवून घेतात. द्राक्ष बागायतदारांना रोज मजुरांचा शोध घेण्याची गरज पडत नाही. 

या मजुरांकडून द्राक्ष बागांची कामे वेळेत होतात. यावर्षी कोरोनामुळे चार महिन्यांपूर्वीच मजूर गावांकडे गेले आहेत. मजूर अजूनही तालुक्‍यात आले नाहीत. मजूर आले तरी त्यांना लॉकडाऊनमुळे अडचणी होणार आहेत. 
पंधरवड्यापासून फळ छाटणी सुरू होईल. पाऊस, हवामानाचा अंदाज घेऊन छाटणी पूर्वमशागत करू लागले आहेत. परप्रांतीय मजुरांसाठी मजुरांच्या ठेकेदारांशी संपर्क सुरू झाला आहे. तालुक्‍यातील सातशे एकर द्राक्षाचे क्षेत्र परप्रांतीय मजुरांवर अवलंबून आहे. द्राक्ष बागेची छाटणी आगामी न घेता एक महिना उशीरा म्हणजेच ऑक्‍टोबरमध्ये छाटणीचा वेग वाढण्याची शक्‍यता आहे. 

"द्राक्षबागेच्या सर्व कामांसाठी बाहेरुन येणार मजुरांकडून कामे करुन घेणे द्राक्ष बागायतदारांना अधिक परवडते. देविखिंडी परिसरात नाशिक भागातील मजुर दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आगाप हंगाम न धरता एक महिना म्हणजे ऑक्‍टोबर महिन्यातील छाटणीस प्राधान्य दिले जाते. आधीच यंदाच्या हंगामात कोरोनामुळे दर पडल्याने कबरंडे मोडले. यंदाच्या हंगामाने साथ दिल्यास बागायतदारांना उभारी येईल.'' 
- सुभाष निकम, देविखिंडी  

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The problem of vineyards due to foreign workers turning their backs