ओल्या दुष्काळाला निकषांची अडचण

ओल्या दुष्काळाला निकषांची अडचण

सातारा - गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटण, जावळी, महाबळेश्‍वर व सातारा तालुक्‍यांतील खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे या चारही तालुक्‍यांतील शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करू लागलेत. पण, ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान या निकषात बसणाऱ्यांना ओला दुष्काळात मदत दिली जाते. त्यामुळे मागणी होणाऱ्या ओल्या दुष्काळाला निकषांची अडचण येणार आहे.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी सातत्याने पाऊस सुरूच आहे. चार तालुक्‍यांत सरासरीच्या ९५ ते १४५ टक्के जास्त पाऊस झाला आहे. परिणामी खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. भुईमूग, घेवडा, सोयाबीन आणि काही प्रमाणात भात पिकांचेही नुकसान झाले आहे. जावळी, पाटण व महाबळेश्‍वर तालुक्‍यांत शेतीचे मोठे नुकसान झाले असून या तालुक्‍यांतील शेतकरी नुकसानीचे पंचानामे करून शासनाने मदत जाहीर करावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी करू लागले आहेत. यासंदर्भात नुकतेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जावळी व सातारा तालुक्‍यांत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच पाटणमध्ये शेतकऱ्यांनी विक्रमबाबा पाटणकर यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर शेकोटी आंदोलन करून ओला दुष्काळाची मागणी केली आहे. महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांतून ही मागणी जोर धरत आहे. 

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील चार तालुक्‍यांत संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. मुळात एका तासात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास तेथे अतिवृष्टी झाल्याचे शासकीय स्तरावर मानले जाते. ६५ मिलिमीटर पाऊस आणि ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्यास त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला जातो. या निकषांमुळे शेतकऱ्यांना भरपाई कशी द्यायची, हा प्रश्‍न शासकीय अधिकाऱ्यांकडून उपस्थित होण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी या चार तालुक्‍यांत झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यास कृषी विभाग सुरवात करेल. पण, त्यातून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्‍यता कमी आहे. ही भरपाई निकषांत न बसविता सरसकट देणे गरजेचे आहे. 

ओला दुष्काळ म्हणजे...
ओला दुष्काळ म्हणजे, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत व नेहमीचे पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे (अतिवृष्टीमुळे) पिकांची झालेली हानी, पुरामुळे जीव व वित्तहानी, पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती उद्‌भवणे होय. ही परिस्थिती दुष्काळाच्या विरुद्ध असते.

गेले तीन महिने सुरू असलेल्या पावसाने खरिपातील पिके कुजू लागली आहेत. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करताना कोणत्याही निकषांत अडकवू नये.
-आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

यंदा तालुकानिहाय झालेला पाऊस 
(मिलिमीटरमध्ये)
पाटण - १२९३
जावळी - १२२८
सातारा - ७५३
महाबळेश्‍वर - ४९०१ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com