निराधार योजनेमध्ये ऑनलाइनची झंझट! 

निराधार योजनेमध्ये ऑनलाइनची झंझट! 

कऱ्हाड - जे निराधार आहेत, त्यांच्यासाठी आर्थिक हातभार देण्याच्या हेतूने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली. त्यासाठी संबंधित लाभार्थींनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत अर्ज भरून आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांना महिन्याकाठी ६०० रुपये मिळतात. मात्र, आता शासनाने या योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरून देण्याची झंझट मागे लावली आहे. अगोदरच आर्थिक परिस्थितीने बेजार असलेल्यांना तहसील कार्यालयात येऊन अर्ज भरणेही मुश्‍कील असते, अशांना आता ऑनलाइन अर्ज करण्याचे व्याप मागे लावल्याने ते मेटाकुटीला आले आहेत. 

शासनाने आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या निराधार, परितक्‍त्या, विधवा, अपंग आणि असाध्य रोगाने पीडित असलेल्यांना सामाजिक अर्थसाह्याच्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्यात ज्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी आहे, अशा निराधार, परितक्‍त्या, विधवा, अपंग आणि असाध्य रोगाने पीडित असलेल्यांना संजय गांधी निराधार योजना, ४० ते ५९ वर्षांपर्यंतच्या विधवांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, १८ ते ५९ वर्षांपर्यंतच्या दारिद्य्ररेषेखालील कुटुंबासाठी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, ६५ व त्यावरील स्त्री-पुरुषांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, १८ ते ५९ वर्षांखालील अपंगांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंअतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना शासनामार्फत सामाजिक अर्थसाह्य योजनेव्दारे ६०० ते ९०० रुपयांपर्यंतचा  लाभ देण्यात येतो. त्यासाठी आवश्‍यक ती कागदपत्रे यापूर्वी संबंधित लाभार्थींनी तहसील कार्यालयातील स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या संजय गांधी निराधार योजना शाखेत सादर करणे आवश्‍यक असते. त्या कागदांची जमावाजमव करून ती कागदपत्रे तहसील कार्यालयात आणून जमा करतानाच त्या लाभार्थ्यांच्या नाकीनऊ येते. त्यातच आता शासनाने लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून देण्याची झंझट मागे लावलेली आहे. अगोदरच आर्थिक परिस्थितीने बेजार असलेल्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयापर्यंत येणे मुश्‍कील असतानाच आता ऑनलाइनचे व्याप मागे लावल्याने ते मेटाकुटीला आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com