सावकाराच्या त्रासाला कंटाळून "म्होरक्‍या'ची एक्‍झिट

kalyan
kalyan

सोलापूर : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट म्होरक्‍याचे निर्माते कल्याण पडाल (वय 38) यांनी सोलापुरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पडाल यांना आतड्याच्या कर्करोगाने ग्रासले होते. उपचारासाठी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्यांना त्रास दिला जात होता. याप्रकरणी दोघा सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रीनिवास संगा, संतोष बसुदे व त्यांच्या साथीदारांवर जेलरोड पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण पडाल यांच्या पत्नी रेणुका पडाल यांनी फिर्याद दिली आहे. कर्करोगामुळे पडाल यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यांनी उपचारासाठी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. कर्ज परत न केल्याने त्रास देण्यास सुरवात केली होती. त्यामुळे ते अधिकच तणावाखाली होते. स्वस्तिक डेव्हलपर नावाने कल्याण पडाल यांचा जागा खरेदी- विक्रीचा व्यवसाय होता. या व्यावसायातून जमवलेले काही पैसे त्यांनी अमर देवकर दिग्दर्शित म्होरक्‍या चित्रपटात गुंतवले होते. दरम्यान, मुलगा कल्याण यास कर्करोग झाल्याचे कळताच वडील राजमोगली पडाल यांना धक्का बसला होता, त्यातच त्यांचे महिन्यापूर्वी निधन झाले. 

औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने पडाल यांनी श्रीनिवास संगा (रा. विजयनगर, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्याकडून जानेवारी 2017 मध्ये एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. तर संतोष नारायण बसुदे (रा. इंदिरानगर, सोलापूर) यांच्याकडून सप्टेंबर 2016 मध्ये एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. संगा यांनी चक्रवाढ व्याजाने आकारणी करून नऊ लाख रुपयांची मागणी केली. दमदाटी करून धनादेशावर सह्या घेतल्या. बसुदे यांनी चक्रवाढ व्याजाने आकारणी करून जानेवारी 2018 मध्ये 11 लाख रुपये गाळे खरेदीपोटी दिल्याचे लिहून घेऊन पडाल यांचा गाळा घेतला होता. पैशासाठी दोघेही धमकी देत होते. संगा हा गुंड, तडीपार असल्याचे पडाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

याप्रकरणात श्रीनिवास संगा आणि संतोष बसुदे या दोघा सावकारांचा शोध पोलिस घेत आहेत. 

दोन्ही गुंड पैसे परत मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. प्रसंगी माझा जीवही घेऊ शकतील. माझ्या कुटुंबीयांचे अपहरण करतील. मी माझ्या तब्येतीमुळे खचून गेलो आहे. याचा प्रचंड मानसिक दबाव असल्याने मी आत्महत्या करण्याची शक्‍यता आहे. मी आत्महत्या केल्यास खासगी सावकर संगा आणि बसुदे किंवा त्यांचे गुंड कारणीभूत असतील. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 
- कल्याण पडाल 
(आत्महत्येपूर्वी पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com