उत्पादन शुल्कची सहा गस्त पथके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

कऱ्हाड - थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट दारूविक्रीवर नियंत्रण राहण्यासाठी व संबंधितांवर थेट कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात पाच विशेष गस्त पथके तैनात करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क खात्याने घेतला आहे. त्याचे काम मागील आठवड्यापासूनच सुरू झाले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी या पथकांकडून ७४ गुन्हे दाखल करून त्यात ५९ जणांना अटक केली. कारवाईत सुमारे १४ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

कऱ्हाड - थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट दारूविक्रीवर नियंत्रण राहण्यासाठी व संबंधितांवर थेट कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात पाच विशेष गस्त पथके तैनात करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क खात्याने घेतला आहे. त्याचे काम मागील आठवड्यापासूनच सुरू झाले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी या पथकांकडून ७४ गुन्हे दाखल करून त्यात ५९ जणांना अटक केली. कारवाईत सुमारे १४ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची आवक होत असते. त्या विरोधातील कारवाईसाठी उत्पादन शुल्क व पोलिसांना सतर्क राहावे लागते. गोवा, दीव व दमण भागातील अवैध व बनावट दारू येथे येते. त्यावर यापूर्वीही मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. मागील दोन महिन्यांत कऱ्हाड तालुक्‍यातच बनावट दारू तयार करणारे दोन अड्डे उद्‌ध्वस्त केले होते. त्यावेळी पोलिस व उत्पादन शुल्कने एकत्रित कारवाई केली होती. मात्र, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कने कारवाईचा प्लॅन आखला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पाच गस्त पथके तयार करून आवक होणाऱ्या दारूवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मागील आठवड्यापासून तैनात केलेल्या गस्त पथकांचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले आहे. जिल्ह्यातील महामार्ग, राज्यमार्गासह जिल्हा मार्गही त्या पथकांनी कव्हर करून तेथे गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 एका पथकात कार्यकारी निरीक्षकासह दहा कर्मचारी आहेत. त्यांना स्वतंत्र वाहन देण्यात आले आहे. संशय येणारी वाहने तपासणीचे अधिकारही त्यांना
दिले आहेत. पाच जानेवारीपर्यंत पथकांनी गस्त घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यापुढेही कायमस्वरूपी काही पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अधिकृत दुकानातूच दारू खरेदी करावी लागणार आहे. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी बिअर शॉपी, वाईन शॉपी व देशी दारू दुकाने रात्री एकपर्यंत तर परमिटरूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. त्या सगळ्या प्रकारात अवैध दारू विकणाऱ्यांचे जाळे तयार होताना दिसत आहे. त्यामुळे त्यावर कारवाई करण्यासाठी विशेष गस्त पथकांना अधिकार देण्यात आले आहेत.

...अशी झाली कारवाई
उत्पादन शुल्कच्या विशेष गस्त पथकांद्वारे कालअखेर ७४ ठिकाणी छापे टाकून सुमारे १४ लाख ४३ हजार २५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी कारवाई झाली आहे. कारवाईत ५९ जणांना अटक झाली आहे. उत्पादन शुल्कच्या कारवाईत सुमारे १८८ लिटर बनावट दारूसह हातभट्टीची वीस लिटर, दारू तयार करण्याचे रसायन सहा हजार ६०० लिटर, विदेशी दारू वीस लिटर, देशी दारू २५० लिटर, परराज्यातून आलेली दारू ७०० लिटर, ताडी ३९० लिटर जप्त झाली आहे.

Web Title: Production Tax Patrol Squads