'या' साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवसेनेला प्रथमच संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

माजी अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, कारखानदारी अडचणीत आहे. एकदिलाने काम करून कारखाना सुस्थित आणूया. डॉ. जाधव म्हणाले, कारखाना अडचणीच्या काळात संचालक एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. पुढेही कारखान्याच्या हितासाठी ऐक्‍य कायम ठेवावे.

आजरा ( कोल्हापूर ) - आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रा. सुनिल अर्जुन शिंत्रे यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशीक सहसंचालक (साखर) कोल्हापुरचे डॉ. एस. एन. जाधव होते. अध्यक्षपदासाठी प्रा. शिंत्रे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. निवड सामंजस्याने व एकमताने झाल्याचे सांगण्यात आले. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदाची संधी शिवसेनेला मिळाली आहे. 

अशोक चराटी यांनी राजीनामा दिल्यावर हे पद गेली चार महीने रिक्त होते. यापुर्वी 4 सप्टेंबरच्या निवड सभेकडे संचालकांनी पाठ फिरवल्याने निवड झाली नव्हती. फेर निवड प्रक्रिया आज दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळावर झाली. प्रा. शिंत्रे यांचा अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडीची औपचारीकता उरली होती. डॉ. जाधव यांनी प्रा. शिंत्रे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संचालक मुकुंदराव देसाई यांनी अध्यक्षपदासाठी प्रा. शिंत्रे यांचे नाव सुचविले वसंतराव धुरे यांनी अनुमोदन दिले. प्रा. शिंत्रे यांचा डॉ. जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला. 

कारखाना हिताचा कारभार करू

प्रा. शिंत्रे म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत आहे. आतापर्यंत झालेला सत्ता संघर्ष बाजूला ठेवून कारखाना हिताचा कारभार केला जाईल. सर्वच संचालकांना विश्‍वासात घेवून काम करणार आहे. कारखाना स्वबळावर कसा चालेल यासाठी प्रयत्नशील आहे.

माजी अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, कारखानदारी अडचणीत आहे. एकदिलाने काम करून कारखाना सुस्थित आणूया. डॉ. जाधव म्हणाले, कारखाना अडचणीच्या काळात संचालक एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. पुढेही कारखान्याच्या हितासाठी ऐक्‍य कायम ठेवावे. या वेळी उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक विष्णुपंत केसकर, दिगंबर देसाई, सुधीर देसाई, अंजनाताई रेडेकर, सुनिता रेडेकर, दशरथ अमृते, जनार्दन टोपले, मारुती घोरपडे, राजेंद्र सावंत, एम. के. देसाई, ऍड. लक्ष्मण गुडुळकर, अनिल फडके, विजयालक्ष्मी देसाई, आनंदा कांबळे, विलास नाईक, तानाजी देसाई, प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. मलीककुमार बुरुड यांनी आभार मानले. 

मामाचे स्वप्न भाच्याकडून पुर्ण....!
कारखाना स्थापनेसाठी माझे मामा (कै) केदारी रेडेकर यांनी पुढाकार घेतला होता. कारखान्यामुळे तालुक्‍याचा विकास होईल. बेराजगारी दूर होवून शेतकऱ्यांचे हित होईल ही भूमिका होती. त्यामुळे ही संस्था सुस्थित चालवून अध्यक्ष होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मला अध्यक्षपद मिळाल्यामुळे ते पुर्ण झाल्याचे प्रा. शिंत्रे यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prof Sunil Shintre President Of Ajara Sugar Factory