प्राध्यापकांचे वेतन आता बॅंक खात्यात - डॉ. धनराज माने

- शीतलकुमार कांबळे
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

सोलापूर - 'राज्यातील महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन हे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर एक एप्रिलपासून राज्यातील 250 महाविद्यालयांत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे,'' असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी "सकाळ'ला सांगितले.

सोलापूर - 'राज्यातील महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन हे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर एक एप्रिलपासून राज्यातील 250 महाविद्यालयांत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे,'' असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी "सकाळ'ला सांगितले.
वसुंधरा कला महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषक समारंभाच्या निमित्ताने डॉ. माने शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला. यापूर्वी प्राध्यापकांच्या वेतनासाठी "एचटीई' सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्राध्यापकांचे वेतन वेळेवर होत आहे. यात आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. यापूर्वी उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक व महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या माध्यमातून प्राध्यापकांना वेतन दिले जात होते. या प्रक्रियेमुळे वेतन मिळायला उशीर होत होता.

सध्या राज्यामध्ये एक हजार 172 अनुदानित महाविद्यालये आहेत. यापैकी 250 महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या खात्यावर थेट वेतन जमा करण्यात येणार आहे. या 250 महाविद्यालयांची पूर्ण माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतली आहे. उर्वरित महाविद्यालयांची माहिती घेणे सुरू असून, लवकरच राज्यातील सर्वच महाविद्यालयांच्या प्राध्यापकांच्या थेट खात्यावर वेतन जमा होणार आहे. असेही माने यांनी सांगितले.

नव्या कायद्याची अंमलबजावणी लवकरच
विद्यापीठाच्या नव्या कायद्याबाबत माने म्हणाले, की विद्यापीठाचा नवा कायदा अस्तित्वात आला असून, लवकरच या कायद्याच्या अंमलबजावणीस सुरवात होणार आहे. नव्या कायद्यामुळे जुने पद जाऊन त्या जागी नव्या पदांची निर्मिती होणार आहे. कुलगुरूंकडे एकाधिकारशाही नसेल तर कुलगुरू हे सल्लागार मंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतील. नव्या कायद्यानुसार कुलगुरूंना अधिकारांसोबत, कर्तव्येही देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा नवा कायदा हा चांगला व अधिक परिणामकारक ठरणार आहे.

मान्यता असलेल्या जरनल्सचा व्हावा वापर
"यूजीसी'ने काही मान्यता प्राप्त जरनल्सची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या संशोधनपर लेखाला ए.पी.आय. (ऍकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर) ग्राह्य धरण्यात येत आहे. यापूर्वी मान्यता नसलेल्या काही जरनल्समधून संशोधन लेख प्रसिद्ध केले जात होते. याला "ए.पी.आय.'साठी ग्राह्यही धरले जात होते. मात्र आता यात बदल केला आहे. प्राध्यापकांनी "यूजीसी'ने मान्यता दिलेल्या जरनल्समध्येच लेख प्रसिद्ध करवे, असेही माने यांनी सांगितले.

Web Title: professor salary in bank account