पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी १०० कोटी खर्चाचा प्रकल्प

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी १०० कोटी खर्चाचा प्रकल्प

इचलकरंजी - शहरातून होणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रस्ताव तयार करण्याचा विषय मंजुरीसाठी आगामी पालिका सभेत आणण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाचा नेहमीच गंभीर प्रश्‍न बनला आहे. इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे प्रदूषणाची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या प्रश्‍नावर नेहमीच इचलकरंजी शहर कारवाईच्या रडारवर येत असते. परिणामी इचलकरंजीतून होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. सन २०१२ मध्ये पालिकेकडून सुमारे ७८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र याबाबत शासन पातळीवर पाठपुरावा करताना प्रस्ताव सापडला नसल्याचे सांगण्यात आले. 

आमदार सुरेश हाळवणकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीवेळी हा मुद्दा प्रकर्षाने चर्चेत आला. नगर अभियंता संजय बागडे यांनी याबाबतची माहिती देताना नवीन प्रस्ताव सादर करण्याची आवश्‍यकता स्पष्ट केली. त्यानुसार या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी श्री. बागडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. केंद्र शासनाने १ मार्च २०१४ मध्ये मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करता येणार आहे. यामध्ये शासनाकडून ८० टक्के तर पालिकेकडून २० टक्के निधी उपलब्ध होतो.

नवीन प्रस्ताव तयार करण्याचे काम खासगी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या मंजुरीचा विषय लवकरच पालिका सभेसमोर आणण्यात येणार आहे.  साधारणपणे सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव असणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळणार आहे; मात्र याला ताकदीने पाठपुरावा करण्याची आवश्‍यकता लागणार आहे.

‘नमामि गंगा’च्या धर्तीवर ‘नमामि पंचगंगा’
केंद्र शासनाच्या नदी संवर्धन योजनेतून गंगा नदी प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी नमामि गंगा उपक्रम राबविण्यात आला. त्याच धर्तीवर नमामि पंचगंगा हा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे नगर अभियंता श्री. बागडे यांनी सांगितले. 

या संभाव्य कामांचा समावेश

  •   नदीघाट परिसराचे सुशोभीकरण 
  •   कृत्रिम तलावाची बांधणी
  •   ओढ्यांवर धबधब्याची निर्मिती
  •   ‘एसटीपी’ अथवा ‘ईटीपी’ची उभारणी
  •   अंत्यसंस्कारासाठी विद्युतदाहिनी
  •   ओढ्याकाठी वनीकरणाची मोहीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com