युवा संसदेद्वारे विधानसभेचा प्रचार 

तात्या लांडगे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

राज्यातील 97 हजार कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे चार कोटी 85 लाख युवकांसमोर युवा संसद या स्पर्धेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा पाढा वाचला जाणार आहे.

सोलापूर - राज्यातील 97 हजार कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे चार कोटी 85 लाख युवकांसमोर युवा संसद या स्पर्धेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा पाढा वाचला जाणार आहे. मागील पाच वर्षांतील सरकारच्या योजनांवरच विद्यार्थ्यांनी बोलावे, असे निर्देशही महाविद्यालयांना दिले आहेत. युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून 31 ऑगस्टपर्यंत महाविद्यालय, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा आयोजनाचे परिपत्रक शासनाने 9 ऑगस्टला काढले आहे. 

युवकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे, समाज कार्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, युवकांच्या सुप्तगुणांना वाव देणे या उद्देशाच्या नावाखाली सरकारी योजनांवरच विद्यार्थ्यांना बोलणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, 2012 मधील राज्य सरकारच्या युवा धोरणाच्या माध्यमातून युवा महोत्सव, युवा प्रशिक्षण केंद्रे, स्वयंसिद्ध महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण, राज्य युवा विकास निधी, ग्रामीण युवकांसाठी कल्याण विस्तार कार्यक्रम राबविले जातात. तरीही सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ही नवी शक्‍कल लढवली आहे. राज्य व जिल्हास्तरावर युवा संसदच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्‍त शिवार अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, पीकविमा योजना, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सडक योजनांचेच गुणगान गावे लागणार असून या स्पर्धांसाठी सरकारने दीड कोटींच्या खर्चाची तरतूदही केली आहे. 

ठळक बाबी... 
- युवा संसद स्पर्धा आयोजनाचे शिक्षण व क्रीडा विभागाला सरकारचे परिपत्रक 
- महाविद्यालयांमध्ये 15 तर तालुकास्तरावर 20 ऑगस्टपर्यंत स्पर्धांचे आयोजन 
- राज्यस्तरावर 31 ऑगस्टपर्यंत उरकण्याचे शासनाचे परिपत्रकाद्वारे निर्देश 
- केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवरच बोलणे विद्यार्थ्यांना बंधनकारक 
- राज्यातील 97 हजार महाविद्यालयांतील चार कोटी 85 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित 

राज्याची स्थिती 
कनिष्ठ महाविद्यालये 
97 हजार 
युवकांचा सहभाग 
4.85 कोटी 
युवा संसदचा खर्च 
1.31 कोटी 
स्पर्धेचा कालावधी 
10 ते 31 ऑगस्ट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Promoting the Legislative Assembly through the Youth Parliament