फळबाग वृक्ष लागवड योजनेतून मिळणार घरपट्टी सवलत

treeplantation.jpg
treeplantation.jpg

तारळे : राज्य सरकार गेली तीन वर्षे वृक्षारोपण मोहीम राबवित आहे. एक, चार कोटी करत गेल्या वर्षी तेरा कोटी वृक्षलागवड करण्यात आली. यातील किती झाडे जगली हा संशोधनाचा विषय आहे. मात्र ढोरोशी ता. पाटण या छोट्याशा ग्रामपंचायतीने फळबाग वृक्ष लागवड योजनेतून खातेदारांना घरपट्टीत सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे परिसर हिरवागार होण्याबरोबरच मुख्यत्वे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मदत होणार आहे. राज्यासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरेल असा आशावाद ग्रामस्थांना आहे.

पाटण तालुक्यातील दुर्गम तारळे खोऱ्यात वसलेले ढोरोशी हे मध्यम लोकवस्तीचे गाव. या गावाने आपल्या एकीने अनेक विधायक कार्यक्रम गावात राबविले. सुमारे पंधरा लाखांच्या लोकवर्गणीतून कॉलेज इमारत बांधली. ते झाल्याबरोबर चार किमीचे शिवार रस्ते बनविले त्यासाठीही ग्रामस्थांनी लाखभर रुपये खर्च केले. त्यानंतर पाच लाख रुपये लोकवर्गणीतून येथील शैक्षणिक संकुल सुरक्षित व आधुनिक बनविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व एलईडी स्क्रीन बसविल्या. हे होते न होते तोच फळबाग वृक्ष लागवड योजना हाती घेण्यात आली आहे.

अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यास बऱ्याच अंशी माणूस जबाबदार आहे. बदलती जीवनशैली सिमेंटची जंगले, बेसुमार वृक्षतोड आदी कारणांनी पर्यावरणाचा समतोल ढासळतोय. हा समतोल राखण्यासाठी ढोरोशी ग्रामपंचायतीने महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ढोरोशी ग्रामपंचायत अंतर्गत ढोरोशी, वाघळवाडी, शिवपुरी व भैरेवाडी या गावातील खातेदाराला पाच फळझाडे दिली जाणार आहेत. ही झाडे एक वर्षभर जगविल्यावर प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे पाचशे रुपये अनुदान दिले जाणार. ही रक्कम थेट खातेदाराला न देता ती रक्कम घरपट्टीत जमा करण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षीही झाडे जगविली तर पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे. यासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.

खातेदाराने त्याला कोणती झाडे पाहिजेत, ती कोणत्या सर्व्हे अथवा गट नंबर मध्ये लावणार याची माहिती ग्रामपंचायतीला द्यायची. ग्रामपंचायत त्याला ती झाडे मोफत पुरविणार आहे. सुरुवातीला फळबाग घेण्यामागचे कारण म्हणजे लोकांना त्यातुन उत्पनांची संधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर इतर झाडेही लावली जाणार आहेत. शिवाय येथील शासकीय कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व सदस्य आदींवरही यासाठी भरीव योगदानाची जबाबदारी दिली जाणार आहे. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. वर्षी दोन हजार पुढल्या वर्षी पाच हजार असे करत तीन वर्षात अकरा हजार झाडे जगविण्याचे शिवधनुष्य ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने उचलले आहे. या राष्ट्रीय कर्तव्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ढोरोशी गावाने आजपर्यंत सर्वांना सोबत घेत अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबविले आहेत. ही वृक्षलागवड चळवळही सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करू. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी यात सहभाग नोंदवावा

- नलिनी मगर, सरपंच ढोरोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com