कुळ वापर इमारतींना प्रचलित दराने फाळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

कोल्हापूर - प्रस्तावित घरफाळावाढीला सभागृहाने मंजुरी दिल्यास कुळ वापर इमारतींनाही जादाचा आकारला जाणारा घरफाळा मालक वापराप्रमाणेच शिथिल केला जाईल, असा पर्याय महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महापालिकेतील गटनेत्यांसमोर ठेवला आहे. शहरात विकासकामांसाठी नगरसेवकांना जादा निधी हवा असेल आणि महापालिकेचा गाडा नीट हाकायचा असेल तर हा योग्य पर्याय लोकप्रतिनिधींनी स्वीकारावा, असे आवाहनही आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. 

महापालिकेने 2010 ला भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली आहे. या करप्रणालीनुसार दर पाच वर्षांनी घरफाळा वाढ होते. गतवर्षीपासून वाढीचे प्रस्ताव प्रशासन सभागृहासमोर ठेवत आहे; पण वाढीचे हे प्रस्ताव सभागृह धुडकावून लावत आहे. त्यामुळे प्रशासनाने वाढ नामंजूर केल्याचा ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानंतर पुन्हा घरफाळा वाढीचा हा प्रस्ताव यंदाच्या वर्षी प्रशासनाने दिला; पण यंदाही घरफाळा वाढ होऊ द्यायची नाही. यावर नगरसेवक ठाम आहेत. पदाधिकाऱ्यांनीही सभागृहाचा हा कल लक्षात घेऊन घरफाळा वाढ करायची नाही, असा निर्धार केला आहे. 

सध्या भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू असून, या करप्रणालीत मालक वापर इमारतींचा घरफाळा वेगळ्या दराने व कुळ वापर इमारतींचा घरफाळा जादा दराने आकारला जातो. 12 महिन्यांपैकी 8 महिन्यांचे भाडे इमारतमालकांना घरफाळा म्हणून भरावे लागते. त्यामुळे इमारत बांधायची आणि भाडे मात्र महापालिकेकडे भरायचे, असा विचित्र अनुभव मालकांना येत आहे. त्यामुळे कुळ वापर हा प्रकारच या करप्रणालीतून बंद करायचा आणि सरसरकट मालक वापर दाखवूनच घरफाळा आकारणी करायची, असा नवा पर्याय प्रशासनाने ठेवला आहे. 

कुळ वापर मिळकती... 
शहरात कुळ वापर असणाऱ्या सुमारे दहा ते बारा हजार इमारती आहेत. इमारतींना ही सूट दिल्यास दहा ते बारा कोटींचा फटका महापालिकेला बसणार आहे. हा फटका सहन करायची महापालिकेची तयारी आहे; पण त्याऐवजी घरफाळ्यात वाढीचा प्रस्ताव सभागृहाने मंजूर करायला हवा, अशी प्रशासनाची भूमिका आहे. मुंबई महापालिकेत अशाप्रकारची पद्धत आहे. त्यामुळे त्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेत ही प्रणाली राबविण्याचा प्रशासनाचा विचार आहे. 

Web Title: property tax kolhapur