स्वतंत्र आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव 

प्रवीण जाधव 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सातारा - आयुष विभागाचा विस्तार करत नागरिकांना या उपचार पद्धतींचा अधिक लाभ मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तो मंजूर झाल्यावर आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचारांचा फायदा नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे. 

सातारा - आयुष विभागाचा विस्तार करत नागरिकांना या उपचार पद्धतींचा अधिक लाभ मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तो मंजूर झाल्यावर आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचारांचा फायदा नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

देशातील प्राचीन उपचार पद्धतींच्या प्रसाराचा एक भाग म्हणून शासनाने आयुष विभागाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे ऍलोपॅथीबरोबरच आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचारांची सुविधा नागरिकांना शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाली. खासगी ठिकाणी या उपचारांचा व औषधांचा खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे केवळ केस पेपरच्या शुल्कात नागरिकांना या सुविधा मिळायला सुरवात झाली. या उपचार पद्धतीचे बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यापासून आजवर हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. विविध आजारांमध्ये नागरिकांना याचा फायदा होण्यास मदत झाली आहे. 

आयुष विभाग सुरू असला तरी, ज्या आजारांच्या उपचारासाठी आयुर्वेद व युनानी उपचारपद्धतीत दाखल करून घ्यावे लागते, याची सोय अद्याप जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध नाही. त्यासाठी स्वतंत्र आयुष रुग्णालयाच्या सुसज्ज इमारतीची आवश्‍यकता आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतींच्या प्रसारासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र आयुष रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगित तत्त्वावर राज्यातील पाच ठिकाणी अशा रुग्णालयांना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश नाही. परंतु, जिल्ह्यातील नागरिकांनाही ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी डॉ. गडीकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतीच आयुष मंत्र्यांनी जिल्ह्यात भेट दिली. या भेटी वेळी त्यांनी आयुष रुग्णालयाचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये स्वतंत्र आयुष रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. 

स्वतंत्र आयुष रुग्णालय झाल्यास पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र पंचकर्मासाठी खोली, योगा हॉल, सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष, डिस्पेन्सरी, स्टोअर रूम उपलब्ध होईल. त्याचबरोबर रुग्णांना दाखल करण्यासाठीही स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध होतील. आयुर्वेद व युनानी उपचारपद्धतीत काही आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना दाखल करून उपचार केले जातात. त्या उपचारांचा रुग्णांना लाभ देणे यामुळे शक्‍य होणार आहे. पॅरिलिसीस, संधिवात, कावीळ, त्वचारोग, आम्लपित्त यांसारख्या आजारांच्या रुग्णांना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे. 

जागेची चाचपणी सुरू  
स्वतंत्र आयुष रुग्णालयासाठी जागेची व्यवस्था आहे. जिल्हा रुग्णालयाच्या सध्याच्या जागेत ते करता येऊ शकेल काय, याबाबतची माहिती बांधकाम विभागाकडून घेण्याचे डॉ. गडीकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. जागा उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाल्यावर हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे.

Web Title: Proposal of AYUSH hospital in satara

टॅग्स