कोल्हापूरात भूमिगत वीजवाहिनी २२ कोटींच्‍या प्रस्‍तावाला मंजुरी

कोल्हापूरात भूमिगत वीजवाहिनी २२ कोटींच्‍या प्रस्‍तावाला मंजुरी

कोल्हापूर - शहरात डोक्‍यावर लटकणाऱ्या वीजतारांचे जंजाळ आता कमी होण्यास मदत होणार आहे. तीन महिन्यांपासून गाजत असलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजुरी दिली. २२ कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मंजुरीमुळे निधी परत जाण्याचे महावितरणचे संकट टळले आहे. महापौर शोभा बोंद्रे अध्यक्षस्थानी होत्या.

गेल्या महिन्यातील तहकूब सभेसमोर हा विषय होता. रस्ते खोदाईपोटी १२ कोटींची मागणी पालिकेने केली होती. मुळात प्रकल्प २२ कोटींचा आणि अनामत १२ कोटी देणे महावितरणला शक्‍य नव्हते. त्यासंबंधी पत्रव्यवहारही झाला. मंजुरीपूर्वी ज्या तीन प्रभागांत महावितरणच्या ठेकेदाराने रस्ते खोदले, त्याच्यावर कोणती कारवाई केली, असा प्रश्‍न बहुतांश सदस्यांनी केला. ठेकेदार आपला जावई आहे का? त्याचा काय दबाव आहे का? असा सवाल शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना विचारला गेला. संबंधिताचे काम बंद पाडले, नोटीस काढली आहे, असा खुलासा झाला. उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. शारंगधर देशमुख, जयश्री चव्हाण, भूपाल शेटे, सत्यजित कदम, महेश सावंत, विजय सूर्यवंशी या विषयावरील चर्चेत सहभागी झाले.

रस्त्यांची खोदाई झाली; पण पुन्हा रस्ता झाला नाही. सदस्यांनी पदरचे पैसे खर्च करून रस्ते बुजविले, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. सुमारे अर्धा तासाच्या खडाजंगी चर्चेनंतर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रश्‍नावर खुलासा केला. महावितरणशी करार करताना अटी आणि शर्ती घातल्या आहेत. भूमिगत वीजवाहिनी टाकल्यानंतर रस्ता जसा होता, तसाच त्यांना करून द्यावा लागेल. पाचशे मीटरपर्यंतच्या पॅचचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाचशे मीटरच्या कामाला मंजुरी दिली जाईल. रस्ता नीट झाला की नाही याची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांवर राहील.

अनामत रक्कम न घेता परवानगी द्यायला ठेकेदार काही आपला जावई नाही. त्यामुळे किमान २५ टक्के तर अनामत रक्कम घ्या अशी सूचना करून उपसूचनेसह विषय मंजूर केला.
प्रा. जयंत पाटील यांनी जयंती नाला उपसा केंद्रावरील उच्च दाब वीजवाहिनीच्या केबलचा मुद्दा उपस्थित केला. ११ केव्हीची ही वाहिनी आहे. महावितरणला महापालिकेने कामाच्या मोबदल्यात ३१ लाख रुपये दिले होते. तीन महिने कामाची मुदत होती. महावितरणने नियमानुसार काम केलेले नाही. १४०० मीटर लांबीची केबल स्ट्रॉम वॉटर योजनेच्या डक्‍टमधून ओढली गेली आहे. जयंती पुलावर केबल उघड्यावर पडली आहे. त्यावरून एखादा ट्रक गेला तर तो भस्मसात होईल इतकी धोकादायक स्थिती आहे. अडीच लाख रुपये पर्यवेक्षण शुल्क भरले आहे. आयुक्तांनी महावितरणकडून फसवणुकीचे पैसे वसूल करावेत अशी मागणी त्यांनी केली.

अनेक प्रभागांत खांबांवरील वीज गायब असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. महापलिकेकडे ट्यूब लाईट आणि चोक खरेदी करायला पैसे नाहीत इतकी वाईट वेळ आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सरनोबत यांनी ट्यूब लाईटचा पुरेसा साठा असल्याचे सांगताच सदस्यांना संताप अनावर झाला. 
साठा आहे की नाही आताच खात्री करायची, असा पवित्रा त्यांनी घेतला. नियाज खान, अभिजित चव्हाण, राहुल चव्हाण, दीपा मगदूम यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. सरनोबत यांनी वीज विभागाचे गावकरी यांना उत्तरासाठी पाचारण केले. गावकरी हे नवखे असल्याने ते थोडे सावध राहिले. भागातील लोक अंधारात आहेत, प्रशासनाला काही देणे-घेणे नाही असा आरोप सदस्यांनी केला.

दुपारच्या सत्रात शहर हद्दीतील एलईडी पथदिवे बसविण्यासंबंधी ईईएसएलसोबतच्या करारनाम्याच्या प्रस्तावावर चर्चा घडवून आणली. प्रशासनाने काळजीपूर्वक करार करावा. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर सोपवावी. भविष्यात फसवणूक झाली तर सदस्य जबाबदार असणार नाहीत असा इशारा देण्यात आला. चौकाचौकातील हायमास्ट दिवे बंद पडल्याचे उमा बनछोडे यांनी सांगितले.

या महिन्यातील सभेची कार्यक्रम पत्रिका वाचण्यास सुरवात झाल्यानंतर विजयसिंह खाडे पाटील यांनी सुधाकर जोशीनगरातील प्रश्‍न उपस्थित केला. घर तेथे शौचालय योजनेचे काय झाले असे विचारून या भागात पुरेशी शौचालये नसल्याकडे लक्ष वेधले. दिलीप पोवार, रूपाराणी निकम, अजित ठाणेकर चर्चेत सहभागी झाले. सुधाकर जोशी झोपडपट्टी खासगी जागेवर उभी आहे. शौचालये उभारणारी शेल्टर ही संस्था शासकीय अथवा महापालिकेच्या जागेवर काम करते. खासगी जागेत करत नाही. तांत्रिक अडचणी आहेत. मार्ग काढण्याचे काम सुरू आहे असे प्रभारी आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

मंजूर विषय असे (तहकूब तसेच या महिन्यातील सभा)

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्या
  • मटण मार्केट इमारतीची नव्याने बांधणी होणार
  • कंत्राटदारांच्या नोंदणी शुल्कात वाढ
  • डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नावे व्याख्यानमाला होणार
  • जरगनगर उद्यानातील १० बाय १५ फूट जागेवर विरंगुळा केंद्र
  • कपूर वसाहतीतील हॉलचे दिलीपराव माने असे नामकरण
  • शिपुगडे तालीम, विठ्ठल मंदिर ते जुना बुधवार तालमीपर्यंतच्या
  • रस्त्याचे एकनाथ शंकरराव पोवार पथ असे नामकरण
  • गोविंदराव पानसरे स्मारकास जागा देणार
  • खोलखंडोबा देवस्थानचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश
  • हुतात्मा निवृत्ती आडूरकर यांच्या स्मारकास जागा
  • ओम गणेश कॉलनीतील उद्यानास प्रकाश मोहिते यांचे नाव

वेळेचे भान कधी येणार?
महापालिका सभा म्हटले, की ती उशिराच सुरू होणार, हे आता समीकरणच बनले आहे. मागील तहकूब सभेसह नियमित सभेचे कामकाज असतानाही नियोजित वेळेपेक्षा सभा एक तास उशिरा- एक वाजता सुरू झाली. विरोधी ताराराणी आघाडीचे सदस्य अगोदर सभागृहात येऊ बसले. मात्र, सत्तारूढ गटाचे सदस्य एकच्या सुमारास दाखल झाले. विरोधी आघाडीने सदस्यांना वेळेचे गांभीर्य नसल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दर महिन्याच्या सभेत वेळेची ओरड कायम असून नियोजित वेळेनुसार सभा कधी होणार, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.


९६४४७
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com