नगर : आयुष हॉस्पीटल उभारणीस "सेंट विवेकानंद'चा विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी असलेल्या आयुष हॉस्पीटल उभारणीच्या मुद्यावर आज आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

नगर : जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी असलेल्या आयुष हॉस्पीटल उभारणीच्या मुद्यावर आज आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

माजी खासदार दिलीप गांधी यांनी सुचविलेल्या या जागेत हॉस्पीटल उभारणीस स्थानिक शाळा प्रशासन, मुलांचे पालक तसेच शिवसेना व भाजपमधील एका गटाने विरोध दर्शविला आहे. त्यावरुन आज हॉस्पीटल उभारणीला राजकीय रंग प्राप्त झाला आहे.

सेंट विवेकानंद शाळेशेजारील ही जागाच राज्य सरकारची आहे. या जागेत केंद्र शासनाचे आयुष हॉस्पिटलचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मात्र, या प्रकल्पाला शाळा प्रशासन, शिक्षक, पालकांनी विरोध केला आहे. या जागेत आयुष हॉस्पिटल झाल्यास शाळेसाठी मैदानच उरणार नाही, अशी भूमिका विद्यार्थी, पालक व अन्य राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे "आयुष'ला विरोध करण्यासाठी शाळा प्रशासन व पालकांसह भाजप-शिवसेना नेत्यांनी मैदान बचाओ आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, माजी आमदार अनिल राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, महापालिकेतील भाजपचे गटनेते स्वप्निल शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. अभय आगरकर, शहर सरचिटणीस अमित गटणे, नाट्यकर्मी अमोल खोले, कलाकार ज्ञानेश शिंदे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest of Ayush Hospital in nagar district