
लष्कर भरती परीक्षा २ वर्षापासून रखडली तरुणांची निदर्शने; वय ओलांडण्याची भिती
बेळगाव : लष्कर विभागातर्फे शरीरिक चाचणीनंतर लिखीत स्वरुपाची परीक्षा दोन वर्षापासून घेण्यात आली नाही. त्याचे गंभीर आणि दूरगामी परिणाम होऊ लागले आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडण्याची भिती आहे. दुसरीकडे तरुणांवर बेरोजगार होण्याचे संकट घोंगावत आहे. त्यासाठी या परीक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी आज (ता.८) आंदोलन केले. चन्नम्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने करण्यात आली. दरम्यान, या परीक्षेसह लष्कर भरतीसाठी रॅलीही आयोजित करण्यात यावी, अशी मागणी तरुणांनी केली आहे.
बेळगावात चन्नम्मा चौक येथे आज (ता.८) तरुण आणि तरुणी जमले. जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली. त्यानंतर चन्नम्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. येथे विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यात मोठ्या संख्येने युवक सहभागी होते. बेळगावात २ वर्षापूर्वी सीईई शारीरिक परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर विविध कारणांनी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. शारीरिक परीक्षा होऊन दोन वर्षे झाली. लिखीत परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपुढे रोजगाराचे गंभीर प्रश्न ठाकले आहे. देश सेवा आणि सरकारी नोकरीची इच्छा असूनही तांत्रिक कारणांनी संधी मिळत नाही. त्यासाठी परीक्षा घेऊन पात्र तरुणांना देश सेवेची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
भारतीय लष्कर विभागाने याबाबत हलगर्जीपणा केला आहे. त्यासोबत केंद्र आणि खासदारही लक्ष देत नसल्याचा आरोप केला. परीक्षा पुढे ढकलल्याने उमेदवारांचे वय वाढत आहे. कालांतरने नियमानुसार हे युवक पात्र ठरणार नाहीत. यामुळे युवकांच्या दृष्टीने अत्यंत संवेदशिल आणि महत्वाच्या ठरणाऱ्या या विषयाकडे लक्ष द्यावे. देशातील स्थिती सुधारली आहे. कोविड संसर्ग कमी झाला आहे. बांधितांचे आकडे घटले आहेत. त्यासाठी विविध इतर संस्था व शासकीय संस्था परीक्षा घेऊन युवकांना संधी देत आहेत. मात्र, लष्कर सेवेची संधी मिळत नसल्याची तक्रार आहे. एकूणच मागील दोन वर्षापासून न झालेल्या परीक्षेकडे आंदोलनाद्वारे युवकांनी लक्ष वेधले आहे.
Web Title: Protest Of Youths Army Recruitment Exams For 2 Years Age Issue Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..