प्रोव्हिजनल प्रवेश शुल्क महाविद्यालय परत देईना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

द्वितीय वर्षात नापास झालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात प्रोव्हिजनल ॲडमिशन घेता येते. मात्र, आता संबंधित महाविद्यालये संपूर्ण फी घेऊन प्रवेश देतात. उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनानंतरही तो विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास फी परत मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार आता व्यवस्थापन परिषदेसमोर नवे नियम मांडून त्याबाबत ठोस पाऊल उचलण्यात येणार आहे. 
- डॉ. एस. आय. पाटील, प्र-कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ

सोलापूर - द्वितीय वर्षात नापास झालेल्या मुलीने उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला आणि विद्यापीठाच्या नियमानुसार संबंधित महाविद्यालयात एक लाख ८० हजारांची फी भरून अंतिम वर्षाला तात्पुर्ता (प्रोव्हिजनल) प्रवेश घेतला. उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनात नो चेक आल्याने त्या मुलीने महाविद्यालयाकडे भरलेली फी परत मागितली. मात्र, संबंधित महाविद्यालयाने त्यास नकार दिला. त्यानंतर मुलीने विद्यापीठ गाठले. मात्र, फी परत करण्याबाबत काहीच नियम नसल्याने मुलीच्या पालकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या मुलीचा विवाह ठरला. तृतीय वर्षात तिच्या विवाहाचा मुहूर्तही निश्‍चित झाला. मात्र, द्वितीय वर्षात ती एका विषयात नापास झाली. त्या वेळी पालकांनी संबंधित महाविद्यालयास प्रोव्हिजनल प्रवेशावेळी भरलेली फी परत मागितली. त्या वेळी त्या महाविद्यालयाने फी परत देण्यास नकार दिला.

आता विवाहासाठी पैसे 
नसल्याने मुलगी इंजिनिअर झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याची ठाम भूमिका त्या मुलाने घेतली आहे. त्या मुलीच्या पालकांनी थेट पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ गाठले आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांची भेट घेतली. मात्र, फी परत करण्याबाबत काहीच नियम नसल्याचे पालकांना समजताच त्यांनी डोळ्यांत अश्रू घेऊन रिकाम्या हातांनी परतणेच पसंत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provisional admission fee college