पंतप्रधान मोदींचे मानसिक संतुलन बिघडले - पृथ्वीराज पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

"पंतप्रधान मोदी यांनी ही निवडणूक प्रगतीच्या मुद्द्याकडे न नेता व्यक्तिगत स्तरावर बदनामी, दमबाजी, खोटी विधाने करून लढवली आहे. विकासावर भाष्य न करता मोठी बेताल वक्तव्ये खालच्या पातळीवर जाऊन केली. सुदृढ लोकशाहीसाठी ही धोक्‍याची घंटा आहे."

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक आहे. मोदींच्या बेताल वक्तव्याचा आणि असांस्कृतिक टीकेचा कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करत असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. पाटील म्हणाले,""पंतप्रधान मोदी यांनी ही निवडणूक प्रगतीच्या मुद्द्याकडे न नेता व्यक्तिगत स्तरावर बदनामी, दमबाजी, खोटी विधाने करून लढवली आहे. विकासावर भाष्य न करता मोठी बेताल वक्तव्ये खालच्या पातळीवर जाऊन केली. सुदृढ लोकशाहीसाठी ही धोक्‍याची घंटा आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचे दिसून येते. निधन झालेल्या व्यक्तीचा उपमर्द किंवा अपमान होईल असे वक्तव्य करू नये अशी आपली परंपरा आहे. आपली भारतीय संस्कृती देखील तशी आहे. मोदींनी राजीव गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसून येते. राजीव गांधी यांच्या कार्याची दखल अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांनी घेतली होती. परंतु मोदी विसरले आहेत.'' 

श्री. पाटील पुढे म्हणाले,""बोफोर्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजीव गांधींना क्‍लीनचिट दिली होती. तरीही त्यांच्याबद्दल मोदी वक्तव्य करतात. हा प्रकार म्हणजे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे लक्षण आहे. मोदींच्या टीकेला राहुल गांधींनी दिलेले उत्तर म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. बोफोर्समुळे कारगिलचे युद्ध जिंकल्याचा मोदींना विसर पडला आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबर राजकीय गुरू मानले त्या शरद पवारांवर देखील टीका केली. टीका निंदनीय आहे. कॉंग्रेस पक्षातर्फे याचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pruthviraj Patil comment