ट्रोलिंगमुळे तरुणाईत वाढले मनोविकार

ट्रोलिंगमुळे तरुणाईत वाढले मनोविकार

कोल्हापूर - ‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाईक्‍स, कमेंटस्‌चा पाऊस पडत असतानाच ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक प्रतिक्रिया कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. हे झाले एक प्रातिनिधिक उदाहरण.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या घडामोडी, त्याचे सेल्फीज्‌ आणि एन्जॉयमेंटचे स्टेटस्‌ तरुणाईच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिसू लागले आहेत. त्यावर ट्रोलिंग सुरू झाले, की मात्र मूड खराब होऊन नैराश्‍यापर्यंत जाण्याची उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांच्या मते सोशल मीडियावर 
नेहमी व्यक्त होणे, हा एक मानसिक विकार असू शकतो.
स्पर्धात्मक करिअर, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारी सवय, नोकरीच्या ठिकाणच्या समस्या, कौटुंबिक समस्या यांसह वैयक्तिक समस्यांमुळे तरुणाई नेहमीच मानसिक तणावात असल्याचे दिसून येते. त्यात आता सोशल मीडियाचा वापर, त्यावर होणारे ट्रोलिंग आणि ऑनलाईन गेम्सचे व्यसन या कारणांची भर पडली आहे.

सतत मोबाईलच्या स्क्रीनवर असणारे डोळे, त्याच्यावर चालणारी बोटे, एखादा ऑनलाईन गेम खेळताना चाललेली व्हर्च्युअल स्पर्धा, त्यातच मॉर्निंग - इव्हिनिंग सेल्फीज, फोटोज्‌, त्याचे सोशल मीडियावर शेअरिंग आणि त्या फोटोज्‌वरून होणारे ट्रोलिंग या सर्व स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात तरुणाई अडकली आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. चिंतेची बाब म्हणजे शाळकरी मुलांतही याचे प्रमाण अधिक आहे. 

हे आहेत आजार 
* सेल्फायटिस - (सेल्फी काढण्याचे व्यसन)
* ऑनलाईन गेम ॲडिक्‍शन 
* फेसबुक डिप्रेशन 
* नैराश्‍य 
* मन एकाग्र न होणे
* सायकोसिस 
* डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश)

ही आहेत कारणे
* इंटरनेट व सोशल मीडियाचा अतिवापर
* सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया
* फेसबुकमुळे येणारा तणाव 
* ऑनलाईन गेमच्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम 
* ऑनलाईन गेम खेळताना येणारा तणाव
* सोशल मीडियावर सर्फिंग करताना इतरांकडून मिळणारी वाईट वागणूक

स्मार्टफोनचा वाढता वापर, त्याचे लागलेले व्यसन, ऑनलाईन गेमचा वाढता ट्रेंड यामुळे तरुणाई नैराश्‍यात गेली आहे. सहज उपलब्ध होणारा डेटा आणि तो संपविण्यासाठी वेगवेगळे फंडे यामुळे त्यात अधिकच भर पडली. आपण मानसिक आजारग्रस्त आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आई-वडील, नातेवाईकांनी त्यांच्यातील बदल ओळखून मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
- डॉ. पवन खोत,
मानसोपचार विभागप्रमुख, सीपीआर

तरुणाईत हवी मनोविकाराबाबत जागृती
 मानसिक आरोग्य बिघडले आहे, याची जाणीव तरुणाईला होत नाही. सतत निराश वाटणे, उदास जाणवणे, आत्मविश्‍वास नाहीसा होणे, नव्या गोष्टी करण्यात रस नसणे अशी लक्षणे ही मानसिक आजाराची असू शकतात, याचे त्यांना ज्ञान नाही. त्यामुळे युवा पिढीत मनोविकाराबाबत जागृती होणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com