डिजिटल फलकाद्वारे गावागावांत जनजागृती

डिजिटल फलकाद्वारे गावागावांत जनजागृती

कोल्हापूर - जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि आमदारांकडे प्राधिकरणाचा विरोध नोंदविणार, प्राधिकरणामुळे गावांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत गावागावांत डिजिटल फलक लावून जनजागृती केली जाणार आहेत. करवीर पंचायत समितीच्या शाहू सभागृहात प्राधिकरणात समावेश असणाऱ्या गावच्या सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी ४२ गावांचा संपर्कदौरा करून जनजागृती करण्यासह एकूण पाच ठराव करण्यात आले. अध्यक्षस्थानी करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र  सूर्यवंशी होते. 

यावेळी सभापती सूर्यवंशी म्हणाले, ‘‘प्राधिकरणामुळे लोकांच्या अधिकारावर गदा येणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाला विरोध करण्याचे निश्‍चित झाले आहे. प्राधिकरणाविरोधात गावागावांमध्ये जनजागृती करून लोकांचा पाठिंबा मिळवला जाईल.’’ 

वडणगेचे सरपंच सचिन चौगले म्हणाले, ‘‘सर्वच ग्रामपंचायतींनी ऑगस्ट महिन्यात झालेल्या ग्रामसभेत प्राधिकरणाला विरोध करणार ठराव केले आहेत. हे ठराव वाढले पाहिजे. त्यानंतर न्यायालयातही दाद मागता येईल.’’ 

प्रा. बी. जी. मांगले म्हणाले,‘‘या प्रकरणात कायदेशीर मागणीसाठी समिती स्थापन करावी. या समितीमध्ये सरपंच, सदस्य, वकील आणि तज्ज्ञ लोक घेतले जावेत.’’ 

दिनकर आडसूळ (निगवे) म्हणाले,‘‘प्राधिकरण स्विकारून आपण आपली प्रगती गमावून बसू, त्यामुळे याला तीव्र विरोध झालाच पाहिजे.’’

नागदेववाडीचे माजी सरपंच शरद निगडे म्हणाले,‘‘प्राधिकरणातील नियम आणि अटी सर्वसामान्यांना पेलवणाऱ्या नाहीत. त्यासाठी ४२ गावांमध्ये जनजागृती करावी पाहिजे.’’

शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे म्हणाले,‘‘प्राधिकरणाऐवजी पुन्हा हद्दवाढीचा पर्याय समोर ठेवला जाईल. यावेळी आपली भूमिका ठाम असली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे.’’

पंडित लाड (निगवे दुमाला) म्हणाले,‘‘प्राधिकरणाला विरोध करायचा असेल तर ठोस भूमिका घेतली पाहिजे.’’

उत्तम पाटील (निगवे दुमाला) म्हणाले,‘‘प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांना विरोधाचा ठरावा केला पाहिजे. याशिवाय, शिये-कसबा बावडा ६० मीटरच्या होणाऱ्या रस्त्याला विरोध करूनच प्राधिकरण विरोधी आंदोलनाची सुरवात करावी.’’

अशोक पाटील (शिंगणापूर) म्हणाले,‘‘प्राधिकरणामुळे लोकांच्या आणि ग्रामपंचायतींच्या हक्कावर यामुळे गदा येणार आहे.’’ बी. पी. कुलकर्णी म्हणाले,‘‘प्राधिकरण विरोध होत आहे. तर मग नगररचना राबविण्यास हरकत नाही. यामुळे गावांचाही विकास होवू शकतो.’’ 

यावेळी, शशीकांत खवरे (शिरोली पुलाची), अमर पाटील (शिंगणापूर), संदिप पाटील (वाशी) आदी उपस्थित होते. 

बैठकीतील ठराव
  प्राधिकरणाचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे, धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर यांच्याकडे विरोध नोंदविणार
  ४२ गावांचा संपर्क दौरा करून प्राधिकरणाविरोधी भूमिका घेणार.
  कायदेशीर लढाई लढण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करणार.
  गावोगावी प्राधिकरणाविरुद्ध माहिती पत्रके, डिजिटल फलक लावणार.

राजेंद्र सूर्यवंशी राजीनामा देणार
करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे प्राधिकरणाचे सदस्य आहेत. दरम्यान, प्राधिकरणाला वाढता विरोध लक्षात घेऊन सूर्यवंशी यांनी पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करताच उपस्थित सरपंच व उपसरपंचांनी जाेरदार टाळ्या वाजवून सूर्यवंशी यांच्या निर्णयाचे स्वागत केले. 

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत लवकरच बैठक
सचिन चौगले यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आजच्या बैठकीची माहिती दिली. दरम्यान, लवकरच याबाबतची बैठक घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी कबूल केल्याचे चौगले यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com