नोटबंदीमुळे जनतेचे प्रचंड नुकसान - पतंगराव कदम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

सांगली - नोटबंदीचा पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हा देशाच्या अहिताचा आहे. निर्णय चुकल्याचे सरकारच्या लक्षात येऊनही ते काही बोलत नाहीत. या निर्णयामुळे जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारच्या या चुकीचा निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून जागृती करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी केले.

सांगली - नोटबंदीचा पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हा देशाच्या अहिताचा आहे. निर्णय चुकल्याचे सरकारच्या लक्षात येऊनही ते काही बोलत नाहीत. या निर्णयामुळे जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारच्या या चुकीचा निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून जागृती करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी केले.

नोटबंदीच्या निर्णयाच्या विरोधात आज कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घेराओ आंदोलन करण्यात आले. आमदार पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, महापौर हारुण शिकलगार, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, प्रतीक पाटील, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजा पाटील, जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. कॉंग्रेस कमिटीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. आमदार कदम म्हणाले, ""नोटबंदीच्या निर्णयामुळे देश अडचणीत आला आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. ज्या देशांनी असा निर्णय घेतला ते आर्थिक डबघाईला आले आहेत. पंतप्रधानांना आपला निर्णय चुकल्याचे लक्षात आले असून ते बोलण्यास तयार नाहीत.'' विश्‍वजित कदम म्हणाले, 'नोटबंदीचे परिणाम आज नसले तरी काही दिवसांनी दिसतील. काही बड्या उद्योजकांचे खिसे भरण्यासाठी हा उद्योग केला आहे. यामुळे देशाचा जीडीपी घटला आहे. बेरोजगारी वाढत आहे.'' प्रतीक पाटील म्हणाले, 'नोटबंदीचा निर्णय हा जनतेच्या भावनांशी खेळ आहे. याचे आम्हीही सुरवातीस स्वागत केले. मात्र 50 दिवसांमध्ये परिस्थिती बिघडतच गेली आहे.''

मोदी सरकार हाय हाय
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह कार्यालयाला घेराओ घातला. यावेळी आंदोलकांना अटक करण्यासाठी पोलिस आले असता, "मोदी सरकार हाय हाय... तानाशाही नही चलेगी... हिटलरशाही नही चलेगी' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले. तेथे कारवाई करून नंतर सोडून देण्यात आले.

उपमहापौर गटाची पाठ
कॉंग्रेसच्या या मोर्चाकडे उपमहापौर गटाने पाठ फिरवली. महापौरांसह सात-आठ नगरसेवकच मोर्चात सहभागी झाले होते. विशाल पाटील गटाने मोर्चाकडे पाठ फिरवल्याने कॉंग्रेसमधील दुही पुन्हा एकदा अधोरेखित झाली. त्यामुळे मोर्चाचे नेतृत्व दिग्गजांनी केले, तरी उपस्थिती मात्र तुलनेने कमी होती.

Web Title: public loss by currency ban