अंदाजपत्रकात जनमताला निश्‍चित स्थान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांच्या मतांना आणि अपेक्षांना स्थान मिळण्यासाठी ‘सकाळ’ने तयार केलेली ‘आमचं शहर आमचं बजेट’ ही पुस्तिका आज महापालिकेकडे प्रदान करण्यात आली. या पुस्तिकेतील अपेक्षांना यंदाच्या अंदाजपत्रकात निश्‍चित स्थान मिळेल, अशी ग्वाही या वेळी उपस्थित मान्यवरांनी दिली. 

कोल्हापूर - महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांच्या मतांना आणि अपेक्षांना स्थान मिळण्यासाठी ‘सकाळ’ने तयार केलेली ‘आमचं शहर आमचं बजेट’ ही पुस्तिका आज महापालिकेकडे प्रदान करण्यात आली. या पुस्तिकेतील अपेक्षांना यंदाच्या अंदाजपत्रकात निश्‍चित स्थान मिळेल, अशी ग्वाही या वेळी उपस्थित मान्यवरांनी दिली. 

महापौर हसीना फरास, आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभ्यासक 
उदय गायकवाड, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

महापालिका दरवर्षी अंदाजपत्रक तयार करते; परंतु त्यामध्ये नागरिकांच्या मतांचा समावेश असावा, यासाठी गतवर्षीपासून सकाळने नागरिकांची मते जाणून घेऊन नागरिकांच्या अपेक्षा मांडणारे ‘आपलं शहर आपलं बजेट’ ही पुस्तिका तयार करण्यास सुरवात केली. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.

महापालिकेचा अर्थसंकल्प कसा असावा? लोकांच्या अपेक्षा काय आहेत, याबाबत ‘सकाळ’ने लोकांना आवाहन केल्यावर नागरिकांनी आपली मते मांडली. तसेच व्हॉटस्‌ॲप, फेसबुक या माध्यमातून तसेच पत्राद्वारेही नागरिकांनी ‘सकाळ’कडे सूचना मांडल्या. या सर्व सूचना ‘सकाळ’ने एकत्रित केल्या. त्याची ‘आपलं शहर आपलं बजेट’ नावाची पुस्तिका तयार करून ती महापालिकेकडे आज सुपूर्द केली. या पुस्तिकेमध्ये पायाभूत सुविधा, वाहतूक समस्या, आरोग्य, उद्योग, शिक्षण, झोपडपट्टी स्थिती, पर्यावरण, माहिती-तंत्रज्ञान, उत्पन्नाचे स्त्रोत, वित्त, ऊर्जा, पर्यटन, सांस्कृतिक आणि मनोरंजन, क्रीडा या क्षेत्रानुसार मते मांडण्यात आली आहेत. या पुस्तिकेतील अनेक सूचना या लोकाभिमुख आहेत. 

या वेळी कार्यकारी संपादक मनोज साळुंखे म्हणाले, ‘‘जग झपाट्याने बदलत चालले आहे. या बदलांचा वेध घेतला पाहिजे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवता येऊ शकतात. काही उपाययोजनांबाबत कॅनव्हास मोठा करून पाहण्याची गरज आहे. स्मार्ट शहरे विकसित होत असताना या शहराच्या तोडीस तोड आपले शहर उभे राहिले पाहिजे. नागरिकांना सुविधा व सेवा हव्या आहेत. त्यांना चांगल्या सुविधा दिल्यास मोबदलाही चांगला मिळू शकतो. ‘सकाळ’ने यासाठी नागरिकांची मते व अपेक्षांचा वेध घेऊन त्या सूचना महापालिकेकडे मांडण्यासाठी या पुस्तिकेची संकल्पना अमलात आणली आहे. लोकांचा आवाजच महापालिकेपर्यंत पोचविण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे.

लोकांचा आवाज बनलेल्या ‘सकाळ’ने महापालिकेच्या अंदाजपत्रामध्ये लोकांच्या मतांना व अपेक्षांना स्थान देण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम निश्‍चितच चांगला असून यामुळे लोकांचे प्रतिबिंबच या अंदाजपत्रकात दिसणार आहे. लोकांनी दिलेल्या सूचनांचा निश्‍चितच येणाऱ्या अंदाजपत्रकांमध्ये अंतर्भाव असणार आहे. 
- हसीना फरास, महापौर

लोकसहभागातून विकास करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ‘सकाळ’ने शहरातील हजारो लोकांची मते जाणून घेतली. त्यांच्या अपेक्षांना आपलं शहर आपलं बजेटमध्ये स्थान दिले आहे. ही पुस्तिका म्हणजे महापालिका अंदाजपत्रक तयार करत असताना लागणारा एक रोडमॅपच असून यातील सूचनांना महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्थान दिले जाईल. 
- पी. शिवशंकर, आयुक्त 

महापालिकेचा कारभार लोकाभिमुख होण्यासाठी ‘सकाळ’ने तयार केलेले ‘आपलं शहर आपलं बजेट’ पुस्तिका निश्‍चितच मार्गदर्शक आहे.  पर्यटन, कचरा, प्रदूषण थांबवणे, हेरिटेज वास्तूंचे जतन यांसारख्या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रश्‍न सुटण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. या सूचनांचा समावेश निश्‍चित महापालिकेच्या येणाऱ्या अंदाजपत्रकात करण्यात येईल. 
 - डॉ. संदीप नेजदार, स्थायी समिती सभापती

नागरिकांचे प्रश्‍न नुसते मांडण्यापेक्षा त्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याची मांडणी करणारी ही पुस्तिका आहे. डिजिटल माध्यमातून नागरिकांनी व्यक्त केलेली मते अत्यंत चांगली आहेत. या सर्वांचे प्रतिबिंब निश्‍चितच येणाऱ्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात दिसेल. तसेच यातील सूचनांची केवळ नोंद न घेता त्या पूर्ण होतात की नाहीत, यावर ‘सकाळ’ने लक्ष ठेवावे.
- अर्जुन माने, उपमहापौर 

गतवर्षी ‘सकाळ’ने लोकांच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत अपेक्षा मांडल्या होत्या. त्याची पूर्तता करण्याचे काम महापालिकेने केले, तसेच यंदाही ‘सकाळ’ने ही पुस्तिका तयार करून महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये लोकांचा सहभाग वाढविला आहे. स्मार्ट शहराच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या सूचना आहेत. या पुस्तिकेतील बहुतांशी सूचना आणि मुद्द्यांचा समावेश अंदाजपत्रकात होईल. 
- संजय सरनाईक, मुख्य लेखापाल

Web Title: public suggession fixed location in budget