रिक्षा भाडेनिश्‍चितीसाठी घेणार जनतेचीच मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

दरनिश्‍चिती समितीकडून ऑनलाइन सर्व्हे 
सातारा - रिक्षा, टॅक्‍सीचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारतात, मीटर टाकत नाहीत, रात्रीच्या वेळी जादा भाडे घेतात, तक्रार कुठे करायची असे अनेक प्रश्‍न रिक्षा, टॅक्‍सीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज भेडसावतात. या प्रश्‍नावर उपाय देण्याची संधी या वाहनांच्या दर निश्‍चिती समितीने सर्व्हेच्या माध्यमातून नागरिकांसाठी दिली आहे. त्यातून आपल्या आवश्‍यक असलेल्या तरतूदी नागरिकांना सुचविता येणे शक्‍य होणार आहे.

दरनिश्‍चिती समितीकडून ऑनलाइन सर्व्हे 
सातारा - रिक्षा, टॅक्‍सीचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारतात, मीटर टाकत नाहीत, रात्रीच्या वेळी जादा भाडे घेतात, तक्रार कुठे करायची असे अनेक प्रश्‍न रिक्षा, टॅक्‍सीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज भेडसावतात. या प्रश्‍नावर उपाय देण्याची संधी या वाहनांच्या दर निश्‍चिती समितीने सर्व्हेच्या माध्यमातून नागरिकांसाठी दिली आहे. त्यातून आपल्या आवश्‍यक असलेल्या तरतूदी नागरिकांना सुचविता येणे शक्‍य होणार आहे.

राज्यातील रिक्षा व टॅक्‍सींच्या दर निश्‍चितीसाठी पूर्वी हकीम समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील वरील प्रवासी वाहतुकीच्या वाहनांच्या दराची निश्‍चिती होते. त्यातूनही निर्माण होणाऱ्या दराबाबतही अनेक तक्रारी राज्य शासनाकडे आल्या. त्यामुळे दर निश्‍चिती करण्यासाठी शासनाने खटवा समितीची नेमणूक केली आहे. राज्यातील रिक्षा-टॅक्‍सी चालक, त्यांच्या संघटना, ग्राहक व ग्राहक संघटना यांची मते जाणून घेऊन दरनिश्‍चितीचे सूत्र ठरविण्याची जबाबदारी या समितीकडे आहे.

समितीने राज्यातील विविध ठिकाणी या संदर्भात बैठका घेतल्या. त्यामध्ये रिक्षा- टॅक्‍सी संघटना, ग्राहक प्रतिनिधी यांची मते जाणून घेतली. या बैठकांमध्ये त्यांच्याकडून दर निश्‍चितीच्या संदर्भात विविध प्रकरची मते समितीसमोर मांडण्यात आली. त्यात मतभिन्नता जास्त आढळून आली. त्या आधारे निर्णय घेणे समितीच्या सदस्यांना सोईस्कर वाटत नाही. त्यामुळे त्यांनी जास्तीतजास्त लोकांकडून मते मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑनलाइन सर्व्हेचा आधार घेण्यात आला आहे.

www.transport.maharashtra.gov.in या परिवहन विभागाच्या साईटवर सर्व्हेचा फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषांमध्ये हे फॉर्म उपलब्ध आहेत, तसेच प्रवासी जनता, रिक्षा-टॅक्‍सी चालक व संघटना या तिघांसाठी तीन वेगवेगळे सर्व्हे फॉर्म देण्यात आले आहेत.

दर निश्‍चितीसाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जाव्यात, भाड्याचा सुरवातीचा टप्पा किती किलोमीटरचा असावा, रात्रीच्या भाड्यात किती पट वाढ दिली पाहिजे, मीटर कोणत्या पद्धतीचा आवश्‍यक आहे, रिक्षा- टॅक्‍सींची संख्या पुरेशी आहे का, त्यामध्ये किती वाढ करणे आवश्‍यक आहे, चालकांकडून वागणूक कशी मिळते, गणवेशाचा वापर होतो का असे विविध प्रश्‍न या सर्व्हे फॉर्ममध्ये विचारण्यात आलेले आहेत. नागरिक, चालक व संघटनांकडून आलेल्या मतांच्या आधारे समिती पुढील निर्णय घेणार आहे.

सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवा - धायगुडे
रिक्षा व टॅक्‍सी भाड्याबाबत, त्यांच्या वर्तणुकीबाबत नागरिकांची नेहमी ओरड सुरू असते. समितीने उपलब्ध करून दिलेल्या सर्व्हेमुळे नागरिकांना आपली मते मांडण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या मतावरच दरनिश्‍चितीचे सूत्र अवलंबून असणार आहेत. त्यामुळे रिक्षा व टॅक्‍सीने प्रवास करणाऱ्यांनी आपल्या आवश्‍यक असलेल्या बदलासाठी सर्व्हेमध्ये सहभागी होणे आवश्‍यक आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी या सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे.

Web Title: public support for rickshw rent decission