महापुराचा "टेंभू'ला 18 कोटींचा फटका ; पंपहाउसमध्ये पाणी शिरल्याने नादुरुस्ती

महापुराचा "टेंभू'ला 18 कोटींचा फटका ; पंपहाउसमध्ये पाणी शिरल्याने नादुरुस्ती

कऱ्हाड  ः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी व महापुराने कऱ्हाड तालुक्‍याची दैना उडाली. त्यात जनजीवन विस्कळित होण्याबराबरच मोठ्या वित्त हानीलाही सामोरे जावे लागले. यात दुष्काळी भागासाठी वरदायी ठरणाऱ्या टेंभू योजनेचे सुमारे 18 कोटी 28 लाखांचे नुकसान झाले आहे. 

पावसाच्या हाहाकाराने ऑगस्टचा पहिल्या आठवड्यात कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत महापुराने थैमान घातले. त्यामुळे दोन्ही तालुक्‍यांतील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले. नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले. प्रशासनाची धावपळ उडाली. सध्या या नुकसानीचे पंचानामे सुरू आहेत. मात्र, या पुराने सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदायी ठरणाऱ्या टेंभू योजनेलाही मोठा फटका बसला. कोयना धरणातून सोडलेले पाणी, तसेच अतिवृष्टीमुळे नदीपात्रात मिसळत असलेल्या पाण्याने मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम टेंभू योजनेच्या पंप हाऊस, बराजमध्ये पाणी शिरले. काही दिवस यंत्रणा पाण्यात राहिल्याने त्यात बिघाड झाला. त्यामुळे दुष्काळी भागाला पाणी उचलून द्यायचे झाल्यास यंत्रणा दुरुस्तीशिवाय ते अशक्‍य आहे, तसेच टेंभू योजेनच्या अखत्यारीतील कृष्णा कालव्याचेही मोठे नुकसान झाले आहे. 13 कोटी 50 लाख व 45 लाख असू सुमारे 14 कोटींचे कालव्याचे नुकसान झाले आहे. टेंभू बराजचेही सुमारे आठ लाखांचे, तसेच पंपहाउस एक अ, तसेच एक ब च्या दुरुस्तीसाठीही 30 लाखांची आवश्‍यकता आहे. कृष्णा नदीचा उजवा काठ तुटल्याने नवीन पुलाच्या कामाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुरुस्ती आवश्‍यक असून, त्यासाठी सुमारे दोन कोटी 50 लाखांची आवश्‍यकता आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा फटका टेंभू उपसा प्रकल्प व्यवस्थापनास बसला असून, त्याबाबतच अहवाल वरिष्ठांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, कालव्याच्या नुकसानीसह कालव्याच्या रस्त्याच्या झालेल्या नुकसानीने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. मोठ्या वाहनांना कालव्याच्या रस्त्यावरून ये- जा करणे मुश्‍कील झाले आहे. मोटारसायकलस्वारांनाही जीव मुठीत घेऊन ये- जा करावी लागते. 

असे झाले नुकसान.... 

कृष्णा कालवा : 13 कोटी 95 लाख 
टेंभू पंपहाउस एक अ, एक ब दुरुस्ती : 30 लाख 
टेंभू बराज व पंप हाऊस दुरुस्ती : आठ लाख 
कृष्णा नदीकाठाचे नुकसान : दोन कोटी 50 लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com