मुंबई, पुण्यातून कोल्हापूरला जायचे आहे? आज प्रवास टाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाट्याजवळ आलेल्या पुराची पाणी पातळीत संथ गतीने कमी होत असून, काल रात्रीपासून पाणी पातळी साधारणतः दोन फूटाने कमी झाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

कोल्हापूर :  कोल्हापूर आणि सांगली शहरांकडे जाणारी रस्ते आणि रेल्वे वाहतूक आजही बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूरजवळ अजूनही पाच-सहा फुट पाण्यात आहे. त्यामुळे कोल्हापूरहून सांगलीकडे जाता येणार नाही. 

मुंबई, पुण्याहून या भागाकडे येणाऱया वाहनांना सातारा जिल्ह्यातील उंब्रजजवळ थांबावे लागेल. इथून कोल्हापूर आणि सांगली सरासरी ८८ किलोमीटर आहे. गेले चार दिवस थांबलेली वाहतूक आज सुरू होण्याची शक्यता नाही. सुरू झाली, तरी सुरळीत होण्यास त्यानंतर १२ ते १४ तास लागू शकतात. 

सांगलीकडे जाण्याचे पर्यायी मार्ग
कडेगाव, विटा, तासगाव, मिरज या मार्गे सांगलीला जाता येऊ शकते. मात्र, हे राज्य मार्ग अथवा अंतर्गत मार्ग आहेत. त्यावर वाहनांची गर्दी होऊ शकते. रेल्वे वाहतूक पूर्ण बंद असल्यामुळे रस्ते वाहतुकीवर ताण येतो आहे. मुंबई, पुण्याहून सातारा, मिरज जंक्शनपर्यंत रेल्वे वाहतूक सुरू आहे.

बाहेरगावी जाणे खोळंबले
मुंबई, पुण्यातून हवाई मार्गे देश-परदेशात जाण्यासाठी तिकीटे बुक केलेल्या कोल्हापूर, सांगलीतील प्रवाशांना गेले चार दिवस मोठा फटका बसला आहे. विशेषतः कोल्हापुरातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद असल्यामुळे प्रवाशांना तिकीटे रद्द करावी लागली आहेत. 

महामार्गावर पोलिस बंदोबस्त
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा जवळ आलेल्या पुराच्या पाणी पातळीत संथ गतीने कमी होत असून, काल रात्रीपासून पाणी पातळी साधारणतः दोन फूटाने कमी झाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस रात्रंदिवस महामार्गावर बॅरिकेट लावून पहारा देत आहेत. 

रस्ता खचण्याचा धोका
अजूनही महामार्गावर चार ते पाच फूट पाणी असून, पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः गेल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune Banglore highway still not starts