प्रवाशांनो, पुणे-बंगळूर महामार्गावर अजूनही पाणी; जाणे टाळा

राजेंद्र हजारे
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

वेदगंगा नदीच्या पुराचे पाणी वाढल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी जवळून वाहत आहे. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून निपाणी कोल्हापूर हा महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शुक्रवारी(ता.९) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील पाणीपातळी साडेचार फूट होती. सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावरील पाणी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निपाणी - वेदगंगा नदीच्या पुराचे पाणी वाढल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाणी यमगरणी जवळून वाहत आहे. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून निपाणी-कोल्हापूर हा महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील पाणीपातळी साडेचार फूट होती. सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि निपाणी भागात होणाऱ्या पावसामुळे वेदगंगा दूधगंगा नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे या नद्या दुथडी भरून वाहण्यासह सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी पसरले आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून राष्ट्रीय महामार्गावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. मांगुर फाटा आणि यमगरणी येथे सर्वच वाहने अडविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे गेल्या पाच दिवसापासून मोठे हाल होत आहेत. यमगरणी आणि मांगुर फाटा परिसरातील वृद्ध नागरिकांनी रुग्णांना आपत्कालीन व्यवस्थेतून रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच पुन्हा पावसाचा जोर वाढला असल्याने रस्त्यावरील पाणी ओसरणार की वाढणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. मांगुर फाटा परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून परिसरातील हॉटेल आणि घरेही पाण्याखालीच आहे. तरीही खबरदारीचे उपाय म्हणून महामार्गावरील रस्त्यावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

'महामार्गावरील रस्त्यावरून अद्याप साडेचार ते पाच फूट पाणी वाहत आहे. अद्याप या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याने शुक्रवारी दिवसभर हा मार्ग बंद राहणार आहे. सायंकाळी पाणीपातळी कमी झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार वाहतूक सुरू केली जाईल. '
- संतोष सत्यनायक, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Banglore highway still under water