esakal | पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिष्ठेची; भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस सामना रंगणार
sakal

बोलून बातमी शोधा

 Pune Graduate Constituency Election State President's Reputation; NCP will play against BJP

पुणे पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशीच लढत असेल. ही लढत जशी या दोन पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिष्ठेची; भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस सामना रंगणार

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशीच लढत असेल. ही लढत जशी या दोन पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे तशीच या दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांसाठीही असेल. या दोघांच्या पसंतीवरच या मतदारसंघातील उमेदवार ठरणार आहेत. ही निवडणूक पक्ष पातळीवर होत नसली तरी या निवडणुकीची गणिते पक्षीय राजकारणाचीच असतात. 

गेल्या पंचवीस वर्षांत या मतदारसंघातून भाजपने आपल्या संघटनात्मक बांधणीच्या जोरावर पक्ष म्हणून उत्तम नेटवर्क उभे केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीतून हे उभे राहिले आहे. याउलट कॉंग्रेस-राष्ट्रवादीची या मतदारसंघातील छाप कायमच व्यापक जनाधारावर राहिली आहे; मात्र या निवडणुकीतील नेटवर्कचे महत्त्व जसजसे स्पष्ट होत गेले तसतसे या मतदारसंघातून शरद पाटील, राजेश पाटील वाठारकर, अरुण लाड, सारंग पाटील या मंडळींनी मतदारसंघात मतदार नोंदणीपासून मतदारसंघाची बांधणी करीत भाजपला शह द्यायचा प्रयत्न केला; मात्र भाजपच्या एकमुखी प्रयत्नांमुळे आधी प्रकाश जावडेकर आणि नंतर चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघातून यश मिळवले. 

गतवेळच्या निवडणुकीत सारंग पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज अरुण लाड यांनी बंडखोरी केली. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांना निसटता विजय मिळाला. हा पराभव त्यावेळी राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्या विजयानंतर चंद्रकांत पाटील यांचे स्टार इतके चमकले की, पुढे भाजपच्या युती सरकारमध्ये राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री झाले. त्यानंतर आता त्यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आले आहे. 

राज्यातील सत्तांतरानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. चंद्रकांत पाटील आता रिंगणात नाहीत. त्यांच्या जागी भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. भाजपची या मतदारसंघातील मोर्चेबांधणीही आता पूर्वीइतकी राहिलेली नाही. गतवेळचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार राष्ट्रवादीचे सारंग पाटील यांनी स्वतःहून निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता ही उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी अरुण लाड यांचे पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आता जयंत पाटील यांच्याकडे आली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या चारही जिल्ह्यांवर विशेष लक्ष असते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तीन पक्षांचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी नेमके काय धोरण ठरते हेही महत्त्वाचे आहे; मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील या प्रतिष्ठेच्या जागेवर राष्ट्रवादीच आपला दावा सांगणार हे नक्की. पक्षाची उमेदवारी मिळवणे हेच अरुण लाड यांचे हे पहिले उद्दिष्ट असेल. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मतदार नोंदणी आणि राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे. निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून येत्या महिन्याअखेरीपर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

2014 च्या निवडणुकीचा निकाल 

  • चंद्रकांत पाटील (भाजप)- 61,453 
  • सारंग पाटील (राष्ट्रवादी)- 59, 073 
  • अरुण लाड (अपक्ष)- 37,189 
  • शैला गोडसे (अपक्ष)- 10,594 
  • प्रा. शरद पाटील (जनता दल)- 8,519. 

संपादन : युवराज यादव