'राणेंचा फोन आला, माझ्या मुलाला वाचवा पण मी नकार दिला'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

शेडेकर कोल्हापूरचे सुपुत्र
प्रकाश शेडेकर मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण करंबळी (ता. गडहिंग्लज) येथे झाले. त्यांचे वडील कै. दादोजी शेडेकर कडक शिस्तीचे शिक्षक होते. प्रकाश यांचे माध्यमिक शिक्षण एम. आर. कॉलेज गडहिंग्लज येथे झाले. त्यांनी वारणानगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेतून ते शासनाच्या सेवेत हजर झाले. 

पुणे - खासदार नारायण राणे यांनी मला फोन केला, की माझ्या मुलाला वाचवा. पण, मी त्यांना नकार दिला, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी सांगितले. प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर नितेश राणे यांनी चिखलफेक करत शिवीगाळ केली होती.

आमदार नीतेश राणे व त्यांच्या समर्थकांनी चिखलाची आंघोळ घातलेले महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबीयांची भेट देण्यासाठी पालकमंत्री व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नितेश राणे यांच्यासह समर्थकांवर खुनाचा प्रयत्न असेही कलम लावा, असे आदेश पोलिस अधीक्षकांना सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले.

नीतेश राणे यांच्या कृत्यानंतर शेडेकर यांच्या आईला अश्रू अनावर झाले होते. त्यांनी आपली कैफियत मंत्री पाटील यांच्यासमोर मांडली. ‘आमच्या मुलाचा काय दोष साहेब? आमच्या मुलाच्या प्रामाणिकपणाची हीच शिक्षा आहे का? असे प्रश्‍न विचारत शेडेकर यांच्या आईंनी भावनांना वाट मोकळी करून दिली. शेडेकर यांच्या आई श्रीमती आंबूबाई, काका शामराव शेडेकर, भाऊ सुधाकर, पत्नी कविता व मुलगा प्रथमेश यावेळी उपस्थित होते.

शेडेकर यांना गुरुवारी (ता. ४) ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनी कणकवली येथे भरपावसात चिखलाने आंघोळ घातली होती. या खात्याचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी थेट शेडेकर यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. कर्तव्यदक्षपणे सेवा बजावणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. आरोपींना शिक्षा होणार आणि सरकार अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे. शेडेकर यांना पोलिस संरक्षण दिले असून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली. 

शेडेकर कोल्हापूरचे सुपुत्र
प्रकाश शेडेकर मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण करंबळी (ता. गडहिंग्लज) येथे झाले. त्यांचे वडील कै. दादोजी शेडेकर कडक शिस्तीचे शिक्षक होते. प्रकाश यांचे माध्यमिक शिक्षण एम. आर. कॉलेज गडहिंग्लज येथे झाले. त्यांनी वारणानगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेतून ते शासनाच्या सेवेत हजर झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Guardian minister Chandrakant Patil Visit Prakash Shedekar family