पांगरीत सरपंचपदासाठी तिरंगी लढत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

बिजवडी - पांगरी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस- भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दुरुंगी लढत होत असली, तरी कॉंग्रेसमधील बंडखोरीमुळे सरपंचपदाची निवडणूक तिरंगी होत आहे. कॉंग्रेसचे दिलीपराव आवळे, तर राष्ट्रवादीचे पोपटराव आवळे या चुलत- बंधूंतच खरी लढत पाहायला मिळणार आहे. 

बिजवडी - पांगरी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस- भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दुरुंगी लढत होत असली, तरी कॉंग्रेसमधील बंडखोरीमुळे सरपंचपदाची निवडणूक तिरंगी होत आहे. कॉंग्रेसचे दिलीपराव आवळे, तर राष्ट्रवादीचे पोपटराव आवळे या चुलत- बंधूंतच खरी लढत पाहायला मिळणार आहे. 

पांगरीची लोकसंख्या एक हजार 470 असून, गावात धनगर समाज 60, मराठा 20, तर इतर समाज 20 टक्के आहे. या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाचे पडले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने दिलीपराव आवळे, तर राष्ट्रवादीने पोपटराव आवळे यांना उमेदवारी दिली आहे, तसेच कॉंग्रेसमधील लक्ष्मण खरात यांनी बंडखोरी करून सरपंचपदासाठी कंबर कसली आहे. 

निवडणुकीच्या सुरवातीलाच गावची निवडणूक बिनविरोध करावी, अशी भूमिका भाजपच्या चंद्रकांत जगदाळे यांनी घेतली होती. मात्र, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे निवडणूक होत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची गावात चांगली ताकद असून, जगदाळे यांनी भाजपचीही थोडीफार ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसला भाजपने साथ दिल्याने राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण झाले असले, तरी सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत कॉंग्रेसमधील बंडखोरी राष्ट्रवादीला फायदेशीर ठरण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

पांगरीत माण तालुका खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष व सरपंचपदाचे उमेदवार पोपटराव आवळे, माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चंद्रकांत दडस, विठ्ठलराव गायकवाड, सहकार बोर्डाचे संचालक चंद्रकांत जगदाळे या पदाधिकाऱ्यांसह गावातील राजकीय नेतेमंडळींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येत आहे. 

खरातांची उमेदवारी कोणाला तारक- मारक! 

पांगरी ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जातीचे आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेले व माण तालुका खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष पोपटराव आवळे व (कै.) नारायण आवळे शैक्षणिक संकुलाचे संस्थापक दिलीपराव आवळे या सख्ख्या चुलतबंधूंत लढत होत असून, कॉंग्रेसमधील बंडखोर लक्ष्मण खरातांची उमेदवारी राष्ट्रवादीला तारक ठरणार, की कॉंग्रेसला मारक ठरणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

Web Title: pune news gram panchayat election