पुणे - सातारा वाहतुक धिम्या गतीने सुरु

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील स्थिती.

सातारा : पुण्यात (बुधवारी , ता. 25) रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील पुण्याहून साताऱ्याकडे येणारी वाहतुक पुर्णतः खोळंबली होती. सध्या वाहतुक सुरळीत सुरु असली धिम्या गतीने असल्याची माहिती मुख्य बसस्थनाकातील नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

पुण्यात बुधवारी ता. 25 रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांना कात्रज, वारजे या ठिकाणाहून पूढे जाता येत नव्हते.

हीच परिस्थिती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार पुणे- सातारा रस्त्यावर होती. त्यामुळे अनेक बस जिथल्या तिथे अडकून पडल्या. आज (गुरुवार) सकाळी नऊ वाजता या बस साताऱ्यात पोहचल्या.

साताराहून ही पुणे, मुंबई येथे बस रवाना झाल्या आहेत. परंतु महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु असल्याने बस पुण्याला पोहचण्यास वेळ लागत आहे. दरम्यान पुण्यावरून सातारा, कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर येथे प्रवास करणाऱ्यांना सध्या तरी काही अडचण नसल्याचे सातारा पोलिस नियंत्रण कक्षातून नमूद करण्यात आले आहे.
प्रवाशांना कोणतीही अडचण भासल्यास नजीकच्या पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन ही करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune - Satara traffic slows down