धनंजय जाधव यांची पुणतांब्यात मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

कर्जमाफीचा जल्लोष; दुसऱ्या गटाने उभारली गुढी

कर्जमाफीचा जल्लोष; दुसऱ्या गटाने उभारली गुढी
पुणतांबे - शेतकरी संपाची कल्पना मांडून यशस्वी करणाऱ्या पुणतांब्यात कर्जमाफीच्या जल्लोषासाठी दोन गटांकडून काल (सोमवारी) वेगवेगळ्या मिरवणुका काढण्यात आल्या. डॉ. धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा फूट गुढी उभारण्यात आली आणि किसान क्रांती संघटनेचे समन्वयक धनंजय जाधव यांचे येथे आगमन होताच शेतकऱ्यांनी त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली.

येथूनच पुकारलेला संप 7 जूननंतर मागे घेतल्यावरून काही काळ वाद झाले. तरीही सरकारने कर्जमाफी जाहीर केल्याने शेतकरी आनंदित झाले. त्या आनंदात डॉ. धनवटे यांच्या समर्थक शेतकऱ्यांनी विजयी गुढी उभारून आनंद साजरा केला. गावातून मिरवणूक काढली. त्यात अरुण बोरबने, साहेबराव बनकर, बाळासाहेब चव्हाण, मनोज गुजराथी, नीलेश दुरगुडे, राजेंद्र थोरात, आप्पा चव्हाण, भीमा वाणी, पप्पू जेजूरकर आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात समावेश असलेले किसान क्रांती समन्वयक धनंजय जाधव काल येथे येताच त्यांच्या समर्थकांनी बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढली. या वेळी बाप्पा वाघ, नितीन सांबारे, संभाजी गणे, अभय धनवटे, डॉ. अविनाश चव्हाण, प्रताप वहाडणे, चंद्रकांत वाटेकर, बाळासाहेब गगे आदी सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजराने परिसर दणाणून गेला होता.

Web Title: puntambe news dhananjay jadhav rally