विद्यापीठाचा प्रथमच ऑनलाइन वर्धापन दिन! पालकमंत्री भरणे म्हणाले... 

ahilyadevi-holkar_201903209065.jpg
ahilyadevi-holkar_201903209065.jpg

सोलापूर : एका जिल्ह्यासाठी असलेल्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अल्पावधीत गुणवत्तेत नावलौकिक मिळविला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत विद्यापीठाने देशभर भरारी घेतली. देशातील व विदेशातील नामांकित संस्था व विद्यापीठांशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली केली, असे गौरवोद्गार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 16 वा वर्धापन दिन शनिवारी (ता. 1) प्रथमच ऑनलाइन पार पडला. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विद्यापीठ, वर्धाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले, तर मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांनी आभार मानले. ऑनलाइन कार्यक्रमासाठी डॉ. एस. डी. राऊत, प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी परिश्रम घेतले. 

पालकमंत्री भरणे म्हणाले, ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक नगरीत तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे स्वतंत्र विद्यापीठ सुरु झाले. विद्यापीठाने 16 वर्षे पूर्ण करीत शिक्षणात गुणवत्तापूर्ण प्रगती केली. विद्यापीठात भाषा, आरोग्य, कृषी पर्यटन अभ्यासक्रमाबरोबरच उजनी धरणाच्या संशोधनाचे चांगले कार्य झाल्याचे कौतुक आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी निश्‍चितच त्याचा फायदा होईल. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, ऑनलाईन कार्यक्रमात विद्यापीठाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्‌घाटन झाले. 


नवीन शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांना फायदा 
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात नवनिर्मिती व संशोधनास मोठा वाव राहणार आहे. शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल झाले असून पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर जाऊन शिक्षण देण्याची व शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्याशाखा तथा अभ्यासक्रमात बदल, कौशल्याभिमुख कोर्सेस तसेच संशोधनाची भरपूर संधी विद्यार्थ्यांना मिळेल. आत्मनिर्भर भारत करण्यासाठीही त्याचा फायदा होईल, असा विश्‍वास कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com