मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर मराठा समाज १०० टक्के समाधानी नाही.  ही सुरवात व पाऊलवाट आहे. ओबीसीत समाविष्ट करून मराठा समाजाला केंद्राने न्याय द्यावा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सांगली - राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर मराठा समाज १०० टक्के समाधानी नाही.  ही सुरवात व पाऊलवाट आहे. ओबीसीत समाविष्ट करून मराठा समाजाला केंद्राने न्याय द्यावा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, ‘‘मराठा सेवा संघ व संबंधित संघटनांनी  मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रचंड संघर्ष, अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे समाजाच्या झालेल्या दुरवस्थेची  योग्य मांडणी केली. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. काही प्रमाणात आरक्षण द्यावे लागले. त्यामुळे समाजाला थोडासा न्याय मिळाला. पण यावर आम्ही समाधानी नाही. ही सुरवात व केवळ पाऊलवाट आहे.

आता सर्वोच्च न्यायालयाचा एसईबीसीबाबत काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे. त्यानंतर पुढील  लढ्याचा  निर्णय घेतला जाणार आहे. आमच्या उन्नतीसाठी केंद्राने समाजाचा ओबीसीत समावेश करावा. कारण आता आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा ओलांडली आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती झाली आहे. केंद्राकडे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, अशी शिफारस राज्य सरकारने करावी. केंद्राने समाजाची दखल घेऊन याचा निर्णय त्वरित घ्यावा. रोहिणी कमिशनचा आयोग लागू केल्यास मराठा समाजासाठी दिलासादायक ठरेल. 

संघाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, शेखर परब, अमृतराव सूर्यवंशी, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purshottam Khedekar demand in Press conference