माॅरिशसच्या पूर्वशाला मराठीची गोडी...!

माॅरिशसच्या पूर्वशाला मराठीची गोडी...!

कोल्हापूर - पूर्वशा सांतराम सखू. ही मूळची माॅरिशसची. मराठी शिकण्यासाठी कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात ती आली आहे. केवळ सात ते आठ महिन्यांत ती  मराठीत चांगली बोलूही लागली आहे.  तीन वर्षांसाठी मिळालेल्या स्काॅलरशीपमधून ती मराठीचे ज्ञान आत्मसात करून मॉरिशसमध्ये मराठी विषयाचे धडे ती देणार आहे. अल्पावधीत शिकलेल्या मराठीमुळे ती कौतुकाचा विषय ठरली आहे.

पूर्वशाने मॉरिशसमध्ये बारावीच्या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकाविला. मॉरिशस सरकारने तिला तीन वर्षांसाठी स्कॉलरशिप मंजूर केली असून,  त्याअंतर्गत ती महावीर महाविद्यालयात मराठी शिकण्यासाठी दाखल झाली आहे. ती बी.ए. भाग एकच्या वर्गात शिकत आहे. मॉरिशसमध्ये पहिलीपासून तिने मराठी विषय निवडला होता. मात्र, अडचण होती ती मराठीत बोलण्याची.

सखू कुटुंब हे मूळचे मराठीच. त्यांचे पूर्वज सातारा जिल्ह्यातील. ते इंग्रजांच्या राजवटीत मॉरिशसमध्ये स्थलांतरित झाले होते. तिची आई शांताबाई व वडिल सांतराम यांना मराठी बोलता येत नसले तरी त्यांनीच मराठी शिकण्यासाठी तिला प्रोत्साहित केले आहे. तिला मातृभाषा माॅरिशियन, क्रेओलसह इंग्रजी व फ्रेंच भाषाही बोलता येते. 

मराठी शिकण्याच्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस व महावीर महाविद्यालयातील डॉ. गोमटेश्वर पाटील यांच्याशी संपर्क साधला. गेल्याच वर्षी तिने महावीर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. मैत्रिणींच्या सहवासात ती चांगल्या पद्धतीने मराठी बोलू लागली आहे.

पूर्वशा म्हणाली,"मॉरिशसमध्ये मराठी शिकविण्यासाठी चांगल्या संधी आहेत. त्यामुळेच मी मराठी शिकण्यासाठी कोल्हापुरात आले आहे."

प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे म्हणाले,"पूर्वशा इथल्या मैत्रिणींमध्ये रमली आहे. दिवाळीला ती कासेगावमधील मैत्रिणीच्या घरीच राहायला होती. दिवाळीचा सण तिने गावातच साजरा केला."

गुढीपाडवा, दिवाळी, गणेशोत्सव, होळी या भारतीय सणांना माझ्या कुटुंबात महत्त्वाचे स्थान आहे. शिवजयंती ही आम्ही धडाक्यात साजरी करतो. नाटकाचे सादरीकरण करतो.
माझ्या कुटुंबात मी एकटीच आहे, जिला मराठी बोलता येते.
- पूर्वशा सांतराम सखू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com