सुभाष देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - महाराष्ट्र बसव परिषद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सहकारमंत्री देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अन्यथा लिंगायत समाजाच्या सर्व संघटना एकत्रित करून राज्यभर मोर्चे काढू असा इशारा महाराष्ट्र बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवानंद हैबतपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचे नाव बदलून, जातीला आरक्षण आणि लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मागून पोट भरणार आहे का? असा उल्लेख सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लातूरच्या बसव महामेळाव्यात केला. त्यांच्या या उल्लेखामुळे लिंगायत समाजाची तीव्र नाराजी पसरली आहे. सहकारमंत्री देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अन्यथा लिंगायत समाजाच्या सर्व संघटना एकत्रित करून राज्यभर मोर्चे काढू असा इशारा महाराष्ट्र बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवानंद हैबतपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्‍वराचे नाव द्यावे, या मागणीसाठी लिंगायत समाज संघर्ष करत असताना आणि कर्नाटक सरकारने स्वतंत्र धर्माची शिफारस केली असताना सहकारमंत्री देशमुख यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. देशमुखांनी लिंगायत समाजाची काळजी करण्यापेक्षा आपली नैतिकता तपासावी. सहकार खात्याच्या व सत्तेच्या माध्यमातून देशमुखांनी जनतेला लुबाडल्याचा आरोपही बसव परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुखांची हकालपट्टी करून लिंगायत समाजाची माफी मागावी अन्यथा कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद पडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेला मनीष काळजे, अक्षय बकालेस्वामी, दत्ता इरपे आदी उपस्थित होते. 

राममंदिर बांधून भरणार का पोट? 
सहकारमंत्री देशमुख म्हणतात विद्यापीठाच्या नावाने, जातीला आरक्षण देऊन आणि स्वतंत्र धर्माची मागणी करून पोट भरतयं का? हे मुद्दे लिंगायत समाजाच्या अस्मितेचे आहेत. मग तुम्ही राम मंदिराचा हट्ट का धरता? राम मंदिर बांधून कोणाची पोटं भरणार आहेत? असा सवालही अॅड. हैबतपुरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Put out the cabinet of Subhash Deshmukh Sayas Maharashtra Basava Parishad