esakal | सांगली व्यापारी संकुलावरून भाजपमध्ये कलह; जागाच ताब्यात नसल्याच्या मुद्यावर कॉंग्रेसचा हल्लाबोल 
sakal

बोलून बातमी शोधा

Quarrel in BJP over Sangli trade complex; Congress attack on the issue of not occupying the land

सांगली जिल्हा परिषद मुख्यालयासमोरील जलस्वराज्य विभागाच्या खुल्या भूखंडावर व्यापारी संकुल बांधण्याचा संकल्प सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आणि अध्यक्ष गटाने केला आहे. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला.

सांगली व्यापारी संकुलावरून भाजपमध्ये कलह; जागाच ताब्यात नसल्याच्या मुद्यावर कॉंग्रेसचा हल्लाबोल 

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः जिल्हा परिषद मुख्यालयासमोरील जलस्वराज्य विभागाच्या खुल्या भूखंडावर व्यापारी संकुल बांधण्याचा संकल्प सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आणि अध्यक्ष गटाने केला आहे. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला. भाजपच्या काही सदस्यांनी या जागेवर व्यापारी संकुल उभारणीस विरोधाची भूमिका घेतली. तांत्रिक मुद्याच्या आधारे हा विरोध समोर आणला असला तरी यामागे कोरे गटाला विरोधाचा छुपा अजेंडा आहे. यात सदस्यांच्या पाठीशी भाजपमधील काही प्रमुख नेत्यांचा हात असल्याचीही चर्चा आहे. 

दरम्यान, ही जागाच जिल्हा परिषदेच्या नावावर नसल्याचे स्पष्ट करीत कॉंग्रेस सदस्य जितेंद्र पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे विषयाला वेगळेच वळण लागले असून, राजकारण तापले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ही बाब गांभीर्याने घेत जागेवर आपले नाव लावण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. पुढील आठ दिवसांत नाव लागेल, असा विश्‍वास कार्यकारी अभियंता सुरेंद्र मिसाळ यांनी व्यक्त केला. परंतु, या विषयावर सर्वसाधारण सभेत रान उठणार, हे नक्की आहे. 

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या खुल्या भूखंडाच्या विकासाच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आहे. जवळपास एक एकर जागेवर व्यापारी संकुल उभे करण्याचा प्रस्ताव अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी पुढे आणला. जिल्हा परिषदेसमोर जलस्वराज्य कार्यालयाच्या इमारतीची ही जागा आहे. त्यासाठी कर्ज उभे करण्याचा प्रस्ताव आहे. त्याला काही सदस्यांनी विरोध करीत व्यापारी संकुल यशस्वी होत नाही, अशी भूमिका मांडली आहे. सोमवारी (ता. 26) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चा होईल. 

भाजपमधील एका गटाने या जागेवर व्यापारी संकुल करण्याला विरोध केला आहे. त्याचे नेतृत्व माजी बांधकाम सभापती अरुण राजमाने करीत आहेत. ते म्हणाले, ""या जागेवर व्यापारी संकुल करणे फायद्याचे नाही. कारण विटा, वांगी, आष्टा, तासगाव या ठिकाणी व्यापारी संकुले आहेत. तेथे भाडे वसूल होत नाही. येथे काही वेगळे होणार नाही. त्यामुळे कर्ज काढून संकुल बांधा आणि भाडे वसूल करायला चपला झिजवा, असे होईल. नवीन संकल्पना घेऊन जागेचा चांगला वापर व्हावा.'' 

भाजपवर टीका 
जितेंद्र पाटील यांनी भाजपवर हल्ला चढविला. ते म्हणाले, ""भाजपने हा गोंधळ चालविलेला आहे. जलस्वराज्य विभागाची जागा अद्याप जिल्हा परिषदेच्या नावावर नाही, हे यांना माहिती नाही का? ही जागा लोकल बोर्डच्या नावावर आहे. आधी ही जागा आपल्या नावावर करून घ्या आणि मग इमले उभारण्याचे स्वप्न पाहा.'' 

संपादन : युवराज यादव

loading image
go to top