इचलकरंजीतील शांतीनगर परिसरात हाणामारी, दगडफेक; आठजण जखमी

पंडीत कोंडेकर
रविवार, 19 मे 2019

इचलकरंजी - येथील शांतीनगर, इंदिरानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन समाजातील गट आमने-सामने आल्याने घटनास्थळी मोठी धुमश्‍चक्री उडाली. जमावाने प्रार्थनास्थळासह घरांवर तसेच वाहनांवर जोरदार दगडफेक केली. घटनास्थळी दगडांचा खच पडला होता. यामुळे भागातील वातावरण तणावपूर्ण झाले.

इचलकरंजी - येथील शांतीनगर, इंदिरानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन समाजातील गट आमने-सामने आल्याने घटनास्थळी मोठी धुमश्‍चक्री उडाली. जमावाने प्रार्थनास्थळासह घरांवर तसेच वाहनांवर जोरदार दगडफेक केली. घटनास्थळी दगडांचा खच पडला होता. यामुळे भागातील वातावरण तणावपूर्ण झाले.

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सदरचा प्रकार घडला. त्यानंतर तातडीने पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन केलेल्या धडक कारवाईमुळे अनेकांची धरपकड केली. सुमारे दोन तास हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी दोन्ही बाजूकडील सुमारे 25 जणांना ताब्यात घेतले आहे. तर दगडफेकीमध्ये एका महिलेसह  8 जण जखमी झाले आहेत.घटनेनंतर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शांतीनगर परिसरात रहाणारा एक युवक दारात आपली रिक्षा धुताना मोठ्या आवाजात टेप लावला होता. त्यावेळी इंदिरानगर परिसरात असलेल्या एका युवकाने मोठ्या आवाजात टेप का लावलास या कारणावरून त्याच्याशी वाद घातला. यामुळे दोन गटातील युवक आमने सामने आले. त्यानंतर दोन्ही गटातील युवक आक्रमक झाल्याने वादावादी सुरू झाली. त्यातूनच दगडफेक सुरू झाली. यामध्ये एका जमावाने इंदिरानगर येथील प्रार्थनास्थळावर जोरदार दगडफेक केली तर दुसर्‍या जमावाने शांतीनगर परिसरातील घरांसह रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहनांवर जोरदार दगडफेक केली. दोन्ही गटातील जमाव आक्रमक झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, सदरची माहिती मिळताच गावभाग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस.निरिक्षक गजेंद्र लोहार हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र दोन्हीकडील प्रक्षोभक झालेल्या जमावाला पांगविण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाटगे, शहापूरचे पोलिस निरिक्षक के. एन. पाटील हे राखीव दलाच्या तुकडीसह दाखल झाले. दोन्हीकडील जमावाला शांत करीत असताना एका समाजातील महिलांच्यात वाद झाल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत धरपकड सुरू केली. तासाभराच्या कारवाईनंतर परिसरात शांतता पसरली. 

या दगडफेकीमध्ये एका महिलेसह 8  जण जखमी झाले. त्यांचेवर आयजीएम इस्पितळात उपचार सुरू  आहेत. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quarrel in Ichalkarani Shantinagar region eight injured