प्रकाशनगर,रुक्‍मिणीनगर,शिक्षक कॉलनीत समस्याच समस्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

अशी आहे स्थिती 

 पाणी रस्त्यातच, खड्ड्यांची चाळण, त्यातच पाणी साचून राहते 
 पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्थाच नसल्याने नागरिक संतप्त 
 गटारांची सोय नसल्याने नागरिकांच्या अडचणींत होतेय वाढ 
 कचऱ्याची समस्याही लोकांनी ठरतेय तापदायक 
 कच्च्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य 

कऱ्हाड ः शहरात असूनही त्यांना सुविधा मिळत नाही. पावसाळा आला की, समस्यांचे माहेरघरच तेथे पाहावयास मिळते. न उचलला जाणारा कचरा, अपुरी गटारांची सुविधा, निचरा न होणारे पाणी आणि रस्त्यांची झालेली चाळण अशी अवस्था शहरातील प्रकाशनगर, रुक्‍मिणीनगरसह शिक्षक कॉलनीत अनुभवयास येत आहे. शहरातील अनेक उपनगरांत मोठ्या समस्या भेडसावतात. त्या समस्या समजून घेण्यासाठी कोणीच लक्ष देताना दिसत नाही. परिणामी त्या असुविधाच आता लोकांच्या अंगवळणी पडल्या आहेत. स्वच्छतेत अव्वल क्रमांक पटकावणारी पालिका असा लौकिक असल्याने तेथील समस्या सोडविण्यासाठी पालिकेत कोणालाच वेळ नाही, अशी त्या भागातील नागरिकांची भावना झाली आहे. प्रकाशनगरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्या भागातील नागरिकांना वाहन चालवतानाही कसरत करावी लागत आहे. त्या खड्ड्यांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा त्रास वेगळाच आहे. रुक्‍मिणीनगर भागात पाणी साचून राहण्याची मोठी समस्या आहे. रस्त्यावर पाणी साचून राहते आहे. त्याचा निचराच होत नसल्याने वाहने बंद पडण्यासारखी स्थिती उद्‌भवते. येथील श्री हॉस्पिटलसमोर तर पाण्याचे तळेच निर्माण होत असते. अनेकदा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये जाताना त्या साचलेल्या पाण्यातून जावे लागते. पाणी निचऱ्याची कोणतीच सोय नसल्याने ही अवस्था होते आहे. मोकळ्या जागेत पाणी साचून राहिल्याने पादचाऱ्यांनाही तेथून जाता येत नाही. छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागील बाजूचा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. शिक्षक कॉलनीत लोकांना त्याच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. त्या भागात जाताना दुचाकी असेल तर केव्हा चिखलात स्लीप होईल, याचा नेम नाही. शिक्षक कॉलनी गटारांचीच सोय नाही. त्यामुळे पाणीनिचरा होताना दिसत नाही. उपनगरांच्या अनेक भागात कचरा पडून आहे. तो उचलला जात नाही. अनेकदा त्याच कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून लोकांना नाहक त्रास सहन करावा लगतो. या सगळ्या समस्यांची माहिती नागरिकांनी पालिकेत दिली आहे. मात्र, त्याकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही. अधिकारी कामात गर्क आहेत. नगरसेवक फिरकत नाहीत. त्यामुळे सुविधांअभावी समस्यांचीच त्या भागातील नागरिकांना सवय झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The question of drainage in Rukmini Nagar