शांतता समितीची बैठकीत अतिक्रमणांवरून प्रशासन धारेवर

शांतता समितीची बैठकीत अतिक्रमणांवरून प्रशासन धारेवर

सातारा ः सातारा शहरात जागोजागी झालेली अतिक्रमणे, पदपथावर टाकलेल्या टपऱ्या, या टपऱ्यांत चालणारे अवैध व्यवसाय आदींसह वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेचा पाढाच आज नागरिकांनी वाचला. नगरपालिकेचे कर्मचारी हप्ते घेतात, असा आरोपही बैठकीत करण्यात आला. या आरोपांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील अतिक्रमणे तातडीने काढण्याची सूचना केली. 
गणेशोत्सव व मोहरम या सणांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात शांतता समितीचे बैठक झाली. या बैठकीस पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपअधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह विविध शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी शहरातील अतिक्रमणांचा प्रश्‍न उपस्थित केला. शहर बस स्थानकासमोरील टपऱ्यांतून मटका व्यवसाय फोफावला आहे. बाजार समिती ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौकापर्यंतचे पदपथ टपऱ्यांनी व्यापले आहेत. राजपथ, कर्मवीर भाऊराव पाटील पथावर विक्रेते मोठ्या प्रमाणात रस्ते व्यापून व्यवसाय करतात. पदपथ, रस्त्यावरून चालण्याची सोय राहिली नाही. पालिकेचे कर्मचारी हप्ते घेतात. "पीडबल्यूडी'च्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही. गणपतराव तपासे मार्गावर दारूच्या दुकानाशेजारी पोलिस प्रशसानाच्या नावाखाली टपरी व्यावसायिकांचा गोरख धंदा सुरू असतो आदी आरोप त्यांनी बैठकीत केले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची सुरक्षिततेसाठी मुख्य बस स्थानक रस्त्यांवरील टपऱ्या हटविण्याचे आश्‍वासन पालिका प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी दिले होते; परंतु आतापर्यंत दोन टपऱ्या हटविण्याशिवाय काहीच झाले नाही आणि होणार नाही. कारण पालिकेचे कर्मचारी हप्ते घेतात. कोणाच्या तरी घरी भाजी जाते, तर कोणाच्या तरी घरी फळे, असेही श्री. पाटील यांनी नमूद केले. त्यांच्यापाठोपाठ अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढेच साताऱ्यातील वाढत्या टपऱ्यांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षितेचा पाढा वाचला. ज्येष्ठ नागरिक काका कुलकर्णी म्हणाले, ""पदपथावरून चालण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. अनेक दुचाकी पदपथवार असतात. रस्त्यावर ही सगळीकडे असुरक्षितता आहे. वाहतूक शाखेचे पोलिस सौजन्याने वागत नाहीत. गणेशोत्सव काळात राजवाडा येथे तक्रार निवारण केंद्र उभारावे.'' 
या बैठकीत नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका स्मिता घोडके, सुनील काळेकर, राहुल पवार, विकास धुमाळ, राहुल यादव, जयंत देशपांडे, गणेश शिंदे, प्रशांत नलावडे, मुरलीधर भोसले, प्रवीण जगदाळे, चिन्मय कुलकर्णी, हेमंत सोनवणे, ऍड. रफीक शेख, अशोक जाधव, केदार आफळे, शरद जाधव, मुरलीधर भोसले, राहुल शिवनामे, दादासाहेब ओव्हळ, धनंजय शिंदे आदींनी सूचना केल्या. 
सातारा शहरातील अतिक्रमांविषयी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्पष्टीकरण दिले. नगरपालिकेच्या पथकाकडून वेळोवेळी अतिक्रमणे काढली जातात. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमित टपऱ्या हटवल्या जातील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 
जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील अतिक्रमणे तातडीने काढण्याचा आदेश दिला. श्‍वेता सिंघल म्हणाल्या, ""गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मांडण्यात आलेल्या समस्यांचे निराकरण होते, की नाही याच्या समन्वयासाठी मुख्याधिकाऱ्यांनी व्हॉटसऍप ग्रुप करावा. शासकीय विभाग व गणेशोत्सव मंडळांसाठी हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी हा ग्रुप उपयुक्त ठरेल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com