आर. के. स्टुडिओचा पाया कोल्हापुरातून

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो ‘वाल्मीकी’ या चित्रपटात. या चित्रपटातील नारद मुनींची भूमिका चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली होती... आर. के. स्टुडिओ विकण्याचा कपूर कुटुंबीयांनी निर्णय घेतल्यानंतर या गोष्टींना आता पुन्हा उजाळा मिळत आहे.

चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर यांचा मुक्कामच सहकुटुंब कोल्हापुरात होता. ‘वाल्मीकी’, ‘महारथी कर्ण’ आदी चित्रपटांची निर्मिती भालजींनी या काळात केली होती. राज कपूर यांच्यासह शशी कपूर यांचा तीन चाकी सायकल चालवण्यापासून ते रंकाळ्यावर फिरायला जाण्यापर्यंत त्यांचा सारा प्रवास आजही येथील काही ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळतोय. राज कपूर यांच्या डोळ्यांची भालजींना भुरळ पडली आणि त्यांनी ‘वाल्मीकी’ चित्रपटातील नारद मुनींच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली.

१९४६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. भालजींनी पाच हजार रुपयांचे मानधन दिल्यानंतर पृथ्वीराज कपूर यांनी ‘मामाजी इतक्‍या लहान वयात एवढे पैसे कशासाठी देता आहात,’ असा प्रश्‍न विचारला होता आणि त्यावेळीच मुंबईत स्टुडिओ उभारण्याचा निर्णय झाला होता.

कोल्हापूरचे असेही प्रेम...
कोल्हापूर महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे (कै.) संभाजी पाटील राज कपूर यांचे चाहते. त्यांनीच पुढाकार घेऊन वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला असून, आजही पाटील कुटुंबीय व राज कपूर यांचे चाहते या पुतळ्याची देखभाल करतात. पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी शशी कपूर कोल्हापुरात आले होते. भालजींनी मानधनापोटी दिलेल्या रकमेतून आर. के. स्टुडिओ उभारण्यात मोलाची भर टाकली. राज कपूर हे नाव जगभरात प्रसिद्ध असले तरी त्यांचा पुतळा उभारणारे आणि कपूर घराण्यावर प्रेम करणारे चाहते कोल्हापुरात असल्याच्या आठवणी त्यांनी यावेळी आवर्जून सांगितल्या होत्या. आर. के. स्टुडिओनिर्मित आणि ऋषी कपूर व माधुरी दीक्षित यांच्या भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चित्रीकरण कोल्हापुरात करण्याचा आग्रहही शशी कपूर यांनी धरला होता.

राज कपूर यांच्या करिअरच्या प्रारंभाचा काळ अगदी जवळून पाहिला आहे. त्यावेळी सारे कपूर कुटुंबीय कोल्हापुरात मुक्कामाला होते. राज कपूर सिनेसृष्टीत नक्कीच काहीतरी वेगळे करून दाखवतील, याची खात्री भालजी पेंढारकर यांना होती. 
- चंद्रकांत जोशी, अध्यक्ष, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी.

Web Title: R. K. The foundation of the studio is from Kolhapur