आर. आर. आबांचे स्मारक मंत्रालय इमारतीच्या स्वरूपात

आर. आर. आबांचे स्मारक  मंत्रालय इमारतीच्या स्वरूपात

सांगली - माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या येथे होणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन आज (ता. १६) होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रम आहे. ‘लक्ष्यवेधी’ कार म्हणून राज्याला  ओळख असलेल्या आर. आर. आबांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे बहुआयामी असेल. मंत्रालयाच्या आकारातील हे स्मारक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असेल.

राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर आर. आर. पाटील यांचे निधन झाले. युती शासनाने त्यांच्या नावाने सभागृह उभारण्यासाठी मंजुरी दिली. आर. आर. पाटील त्यांच्या शैक्षणिक काळात जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी वसतिगृहात रहात होते. त्याच वसतिगृह परिसरात त्यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यानंतर ते राजकीय जीवनात आले. सलग सहावेळा आमदार झालेले आर. आर. पाटील पंचवीस वर्षे आमदार होते. त्यातील १५  वर्षे मंत्री होते.

उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री  ही पदे त्यांनी भूषवली. अभ्यासू, व्यासंगी आर. आर. आबांच्या कामकाजाचा विधिमंडळात ठसा उमटला. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा गौरव झाला. त्यांचे व्यक्तिमत्त्व स्मारकात प्रतिबिंबित करण्याच्या निमित्ताने स्मारक मंत्रालयाच्या स्वरूपात उभारण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये स्मारकात ई-ग्रंथालय, ग्रंथालय, आर्ट गॅलरी, हॉल, मोठी अभ्यासिका असणार आहे. आर. आर. पाटील यांचा अर्धपुतळाही स्मारकाच्या दर्शनी भागात उभारण्यात येणार आहे. तेथे एक डिजिटल वॉलही असणार आहे. त्यावर आर. आर. पाटील यांचे  जीवनचरित्र दाखवले जाणार आहे. 

स्मारकावर असलेल्या डोममध्ये सौर ऊर्जेचे पॅनेल असणार आहेत. त्यामधून स्मारकासाठी आवश्‍यक विजेची निर्मिती करण्यात येणार आहे. एकूणच हे स्मारक ग्रीन अर्थात पर्यावरणपूरक असणार असल्याची माहिती वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी दिली. स्मारकासाठी दोन कोटी ८६ लाख रुपये आले आहेत. स्मारकासाठी एकूण नऊ कोटी ७१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com