विखेंचा राजीनामा अन्‌ भाजपची रणनीती 

विखेंचा राजीनामा अन्‌ भाजपची रणनीती 

नगर -  पश्‍चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील वजनदार कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी विरोधी पक्षनेते पदाचा आणि आज आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी कमळाचे चिन्ह घेऊन नगर लोकसभेची जागा जिंकली. त्याच वेळी हे सर्व काही ठरले होते. त्यानुसार ते पारही पडले. आता विखे पाटील मंत्री म्हणून शपथ घेतील आणि या दोन अंकी राजकीय नाट्याचा दुसरा अंक प्रारंभ होईल. 

पहिला अंक नगर जिल्ह्यातील लोकसभेची एक भाजपची आणि दुसरी शिवसेनेची जागा कायम राखणे आणि विरोधी पक्षनेता आपल्या गोटात आणून कॉंग्रेसला आणखी नामोहरम करणे हा होता. मात्र, आता जो दुसरा अंक सुरू होईल त्यात भाजपची मुत्सद्देगिरी आणि रणनीती केंद्रस्थानी असेल. त्याचाच एक भाग म्हणून विखे पाटील यांना आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री करायचे अन्‌ त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीचा उपयोग राष्ट्रवादीशी दोन हात करण्यासाठी करण्याची व्यूहरचना भाजपच्या गोटात चालू असल्याचे लपून राहिलेले नाही. 

कॉंग्रेस पक्षात होणारी घुसमट आणि भाजपची सुरू असलेली आगेकूच यामुळे विखे पाटील यांना भाजप जवळचा वाटू लागला होता. नगरची खासदारकी आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळविण्याचे विखे पाटील यांचे स्वप्न आता फार दूर राहिलेले नाही. आता भाजपला त्यांच्यासारख्या वजनदार मराठा नेत्याला हाताशी धरून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्ह्याबरोबरच पुणे जिल्हा, तसेच मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपले बस्तान अधिक मजबूत करायचे आहे. त्यातही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादीची ताकद मोडून काढण्यासाठी विखे पाटील यांना जाणीवपूर्वक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याचे घाटत आहे. अर्थात या रणनीतीला विखे व पवार या दोन मातब्बर नेत्यांमधील राजकीय संघर्षाची झालर आहे. 

विखे पाटील हे काल परवापर्यंत विरोधी पक्षनेते होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त बैठका बऱ्याचदा त्यांच्या उपस्थितीत पार पडत. कॉंग्रेसच्या आतील गोटातील व्यूहरचना व डावपेच त्यांच्या उपस्थितीत आखले जात. त्यात त्यांचाही सहभाग असे. एका अर्थाने त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांची बलस्थाने आणि कमकुवत दुवे यांची पुरेपूर माहिती आहे. त्याचा उपयोग भाजपच्या मुत्सद्दी मंडळींनी करून घेतला नसेल तर नवलच. त्यामुळे विखे पाटलांना मंत्री करून त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बहाल करणे, ही बाब या राजकीय नाट्याच्या दुसऱ्या अंकाची सुरवात असेल. 

नगर जिल्ह्यात विखे पाटील यांच्यासारखे साखर, शिक्षण व सहकारसम्राट पाठीशी नसताना भाजप शिवसेना युतीने भाजपचे पाच व शिवसेनेचे एक असे एकंदर सहा आमदार विधानसभेत पाठविले. एकेकाळी जिल्ह्यात काहीच स्थान नसलेल्या भाजप-शिवसेना युतीने बारापैकी सहा जागा नगर जिल्ह्यांत काबीज केल्या. आता विखे पाटील भाजपमध्ये आल्याने बारापैकी किमान दहा जागांवर विजय संपादन करण्याची भाजपला अपेक्षा आहे. नगर जिल्ह्याची आता त्यांना फार चिंता वाटत नाही. विखे पाटलांसारखा मोहरा पक्षात आल्याने त्यांचा उपयोग मराठवाडा व विदर्भातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांबरोबरच शेजारच्या पुणे जिल्ह्यात करून घ्यायचा आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे कमकुवत दुवे हेरण्यासाठी त्यांची मदत घेऊन शक्‍य होईल तेवढी आक्रमक चढाई करायची, अशी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीची भाजपची उघड चाल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com