निवडून दिले, तसे खालीही आपटतील - राधाकृष्ण विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

कोल्हापूर - शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबारांवर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले, ती खाली आपटायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.

कोल्हापूर - शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबारांवर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले, ती खाली आपटायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही "आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर सरकारचे डोळे उघडणार, असा सवाल करून थातूरमातूर उत्तरे देणे बंद करा. स्वतः शेती करायची नाही आणि शाश्‍वत शेतीचा टेंभा मिरवायचा. तूर उत्पादक शेतकऱ्यांना बोनससहित नुकसानभरपाई द्यावी,' अशी मागणी केली.

संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास आजपासून कोल्हापुरातून सुरवात झाली. दोन्ही कॉंग्रेसची मंडळी येथे दाखल झाली आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सभागृहात विखे-पाटील, पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महापौर हसिना फरास, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, 'यवतमाळमध्ये भाजपचे नेते हे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, की ते आळशी बनतील, अशी बेताल वक्तव्ये करतात. या विधानातूनच नादान सरकारची अनास्था स्पष्ट होते. खरे तर या खासदारांना नोबेल पारितोषिकच द्यायला हवे. जखमेवर मीठ चोळण्याचे काम या मंडळींकडून सुरू आहे. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला दिसत नाही का? बंद पडलेली खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर सरकार जबाबदार राहील.''

"सत्तेच्या जोरावर आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करू नये. जी जनता डोक्‍यावर घेते ती खाली आपटायलाही मागेपुढे पाहत नाही, हे ध्यानात असू द्या', अशा इशारा देत एक मे रोजी महाराष्ट्रदिनी ग्रामपंचायतींनी कर्जमाफीचा ठराव करून तो सरकारकडे पाठवावा. तूर खरेदीचा अभाव हे "नाफेड'चे नव्हे, तर सरकारचे अपयश असून, यात महाभ्रष्टाचार झाल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.

बार बंद झाले आणि पेट्रोलमध्ये तीन रुपयांची वाढ केली. इंधनाचे दर वाढले की महागाई वाढते हे सत्य आहे. उत्पन्नाच्या साधनाचे कोणतेही नवे स्रोत नाहीत. पेट्रोलच्या दरवाढीची झळ मध्यम आणि सामान्य नागरिकाने का सहन करावी, असा सवाल अजित पवार यांनी केला. साखर पुरेशी उपलब्ध असताना पाच लाख टन साखर आयातीची गरज काय होती? तपासायचे काम अजित पवारांचे नव्हे, तर साखर आयुक्त आणि सरकारचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीला कोणताही पर्याय नसून, ज्यांच्या सातबारांवर कर्ज दिसते त्यांना माफी द्यावी, असे ते म्हणाले.

चंद्रकांतदादा अघोषित मुख्यमंत्री
थेट पाइपलाइनच्या कामात त्रुटी आहेत. त्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूर कराव्यात. दुसऱ्या क्रमांकाचे पद त्यांच्याकडे आहे. ते अघोषित मुख्यमंत्री असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. शंभर टक्के कर्जमाफी न देणे हा सरकारचा दांभिकपणा असल्याचे त्यांनी नमूद केले.

ठाकरे बडे मियॉं, शेट्टी छोटे मिया
तूर खरेदीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले असताना खासदार राजू शेट्टी कुठे आहेत, असा सवाल करून कर्जमाफीविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी भूमिका घेतात तीच भूमिका शेट्टी घेत असल्याचे सांगून "ठाकरे हे बडे मियॉं, तर शेट्टी छोटे मियॉं' असल्याची टिप्पणी विखे पाटील यांनी केली. राज्यमंत्री सदाभाऊ खोत सत्तेत गेल्यापासून त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला, असे सांगून आठवडी बाजार, थेट खरेदी असे उपक्रम राबविणाऱ्या खोत यांच्यावर भाजपचा इतका परिणाम होईल असे वाटले नव्हते, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: radhakrishna vikhe patil warning to state government