मुश्रीफांच्या घराबाहेर महिला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घर, कारखान्यावर पडलेल्या प्राप्तीकर विभागाच्या छाप्याचे तीव्र पडसाद उमटले असून कारवाईनंतर श्री. मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली आहे.

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घर, कारखान्यावर पडलेल्या प्राप्तीकर विभागाच्या छाप्याचे तीव्र पडसाद उमटले असून कारवाईनंतर श्री. मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली आहे. कारवाईची माहिती मिळताच महिला कार्यकर्त्यांही मोठ्या संख्येने त्यांच्या घराजवळ आल्या, त्यांनी भाजपाच्या निषेधाच्या तर मुश्रीफ यांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला. 

श्री. मुश्रीफ हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत होते. दर मंगळवारी ते मुंबईला जातात आणि गुरूवारी सकाळी परत येतात. आज नेहमीप्रमाणे महालक्ष्मी एक्‍सप्रेसने ते मुंबईहून कोल्हापुरात आले. साधारण आठच्या सुमारास त्यांचे कागल येथील निवासस्थानी आगमन झाले. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठीही कार्यकर्त्यांची नेहमीसारखी प्रचंड गर्दी होती. श्री. मुश्रीफ यांचे घरी आगमन होताच क्षणाचाही विलंब न होता सहा वाहनातून प्राप्तीकर विभागाचे अधिकारी त्यांच्या निवासस्थानी आले. त्यांनी पहिल्यांदा घरी थांबलेल्या लोकांना बाहेर घालवले व कारवाईला सुरूवात केली. पहिल्यांदा अधिकाऱ्यांनी त्यांचा मोटारीची झडती घेतली, पण या मोटारीमध्ये काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. 

सोशल मिडीयाद्वारे वाऱ्याच्या वेगाने ही बातमी कागलसह जिल्ह्यातल पसरली. त्यानंतर श्री. मुश्रीफ यांच्या निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांचा लोंढा लागला. काहीवेळाने महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी गोळा झाल्या. या महिलांना कारवाईच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. भाजापच्या निषेधाबरोबरच श्री. मुश्रीफ यांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन या महिलांनी हा परिसर दणाणून सोडला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radi on MLA Hasan Mushrif house follow up