दरबारी रेडिओचा इंजिनियर हा कोल्हापुरी अवलिया (व्हिडीओ)

संदिप खांडेकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

दुसऱ्या महायुद्धाच्या बातम्या महाराजांच्या कानावर धाडण्याचे काम त्यांच्याकडेच होते. रेडिओच्या पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला त्यांना पाठविण्याचा महाराजांचा मनसुबा होता. राजाराम महाराजांच्या निधनामुळे त्यांना कोल्हापूरची वेस ओलांडता आली नाही.

कोल्हापूर - रविंद नारायण भोसले रेडिओ दुरुस्तीतले डॉक्‍टर. वयाच्या शहात्तरीकडे यांचे शरीर झुकलेय. व्हॉल्व्हच्या रेडिओ दुरुस्तीत ते माहीर आहेत. त्यांचे वडील नारायण भोसले नादुरुस्त रेडिओचे दुखणे लगेच ओळखायचे. महापालिका परिसरातील घरातून पसारा हलल्यावर भोसले कुटुंबीयांची आर्थिक स्थिती ढासळली. महाविद्यालयीन वयात घरची जबाबदारी अरविंद भोसले यांच्या खांद्यावर पडली. गोखले महाविद्यालयात सहा महिने येरझाऱ्या मारल्यावर त्यांचे शिक्षण थांबले. रेडिओ दुरुस्तीच्या कामातला ५८ वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. वडील रेडिओ दुरुस्तीत ख्यातनाम होते. तोच वारसा त्यांच्याकडे आलाय. व्हॉल्व्हच्या रेडिओची कुरकूर दुरुस्त करण्यात त्यांच्या हातांना आजही उसंत नाही. 

 

रेडिओच्या अभ्यासासाठी इंग्लंडला 

नारायण भोसले भक्तीसेवा विद्यापीठ हायस्कूलचे विद्यार्थी. रेडिओच्या प्रत्येक भागाचा साठा त्यांच्या डोक्‍यात होता. रेडिओवरच्या अमेरिकेतून मागवलेल्या पुस्तकांचा तो परिणाम होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या नजरेतून त्यांचे कौशल्य सुटले नव्हते. दरबारी रेडिओ इंजिनियरचं बिरूद त्यांच्या नावापुढे लगेचच लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या बातम्या महाराजांच्या कानावर धाडण्याचे काम त्यांच्याकडेच होते. रेडिओच्या पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला त्यांना पाठविण्याचा महाराजांचा मनसुबा होता. राजाराम महाराजांच्या निधनामुळे त्यांना कोल्हापूरची वेस ओलांडता आली नाही. फिलिप्स कंपनीची १९३५ ते १९५५ पर्यंत यांच्याकडे एजन्सी होती. तपोवनावरील विद्यापीठ हायस्कूलच्या वसतिगृहात पवनचक्कीवर विजेचे दिवे लावण्याचे यश यांचेच. वडिलांच्या रक्तातील इलेक्‍ट्रॉनिकचं वेड बाबा ऊर्फ अरविंद भोसले यांच्या अंगात उतरले. 

 

पहा - अँटिक गाड्यांच्या दुरुस्तीतला हा ‘सिकंदर’ 

बुश, फिलिप्स, नेल्को, मर्फी कंपन्यांच्या रेडिओचे डाॅक्टर

बुश, फिलिप्स, नेल्को, मर्फी कंपन्यांच्या रेडिओची दूरुस्ती
बाबांना प्रकाश, विजय, विलास व मनोहर चौघे भाऊ. कुटुंबाचा आकार मोठा. महापालिकेच्या परिसरातील घर सोडावे लागल्याने आर्थिक घडी विस्कटली होती. त्यांच्या वडिलांनी परिस्थितीपुढे हार मानली नाही. प्रोजेक्‍ट ऑपरेटरचे काम त्यांनी खुबीने पेलले. शिक्षणातून अंग काढून घेतलेले बाबा रेडिओच्या दुरुस्तीत गुंतले होते. रात्री आठ ते अकरापर्यंत दुरुस्तीतल्या क्‍लृप्त्या वडिलांकडून ते शिकत होते. बुश, फिलिप्स, नेल्को, मर्फी कंपन्यांच्या रेडिओचा त्या काळात बोलबाला होता. आवाजात गोडवा व स्पष्टतेचं वलय व्हॉल्व्हच्या रेडिओला चिकटले होते. जगभरातले स्टेशन्स कॅप्चर करण्याची व्हॉल्व्हची खासीयत. त्यासह प्रतिष्ठेच्या कक्षेतले रेडिओ दुरुस्तीचे काम होते. 

काय सांगता - चक्क... डोक्‍याने नारळ फोडणारे हे कोल्हापुरी राॅकेट आण्णा...
 

आजही दुकानात जुन्या रेडिओंची ऊठबस

बाबांचे अन्य चार भाऊ रेडिओ दुरुस्तीपासून दूर राहिले. दुरुस्तीच्या बदल्यातली मिळकत अडीच-तीन रुपयांपलीकडे नव्हती. रेडिओचा आवाज ठीक करण्यात बाबा अल्पावधीत तज्ज्ञ झाले. लक्ष्मीपुरीतले त्यांचे दुकान वर्दळीने गजबजायचे. शेवटच्या श्‍वासापर्यंत वडील याच व्यवसायात होते. दुकानात आजही जुन्या रेडिओंची ऊठबस असते. पाचशे-सहाशे रुपये हातावर टेकवले जातात. व्यवसायातल्या मिळकतीतून बाबांनी बिंदू चौकातील सबजेलजवळ घर खरेदी केले आहे. मुलगा सचिन अर्बन बॅंकेत आहे. धाकटा नितीन बी. ई. सिव्हील इंजिनियर आहे. बाबांच्या हाताला आजही विश्रांती नाही. केवळ १९८० च्या पूर्वीच्या रेडिओंना ते ठीकठाक करतात. विविध कंपन्यांच्या रेडिओंची जंत्री त्यांच्याकडे आहे. पाय कंपनीचा तेरा बॅंड रेडिओ त्यांच्याकडे पाहायला मिळतो. रेडिओची तपासणी करणारे अमेरिकेन मशिनही आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radio repair master in kolhapur

टॉपिकस