रुपया अवमूल्यनावर गप्प का? - रघुनाथ पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच अर्थव्यवस्था सावरेल, असे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

सांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. साऱ्यांची तोंडे का बंद आहेत. शेतीमाल हीच देशाची ताकद आहे. निर्यातबंदी उठवली तरच अर्थव्यवस्था सावरेल, असे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

ते म्हणाले,‘‘नेहरूंपासून ते मोदींपर्यंत सरकार कोणतेही असो त्यांचे धोरण शेतकरी विरोधी राहिले आहे. आता जागतिक स्तरावर रुपयाचे अवमूल्यन होत असतानाही सरकार सुधारणा करायला तयार नाही. आपल्याकडे औद्योगिक उत्पादने जागतिक दर्जाची नाहीत. त्यामुळे त्यातून निर्यातीला संधीच नाही. आपल्याकडे शेतमाल हीच ताकद आहे. त्याच्या निर्यातीत शंभर अडथळे आणले जाताहेत. नागपूरहून दुबईला बोकड निर्यात होणार होती. त्यात धार्मिक मुद्दा समोर आणला गेला. अशाने देशात परकीय चलन येणार कसे? निर्यातबंदी उठवली तर महागाई वाढेल हे साफ चुकीचे आहे. सातवा वेतन आयोग घेणाऱ्या सरकारी व्यवस्थेला याची झळ लागत नाही. सरकारी तिजोरीतील ७८ टक्के पैसे प्रशासनावर खर्च होतोय. ’’

ते म्हणाले,‘‘शेतीचे धोरण बदलावे लागेल. निर्यातबंदी उठवावी लागेल. यावर कुणी काही बोलत नाही. जे लोक विधानसभा, लोकसभेत जातात, त्यांनी काय दिवे  लावलेत ते दिसताहेत. दूध आंदोलनात शेतकऱ्यांचे नुकसानच केले गेले. लोकांनी शहाणे व्हावे. अर्थतज्ज्ञ जयंतराव या विषयावर अद्याप बोलले कसे नाहीत?’’

मी लोकसभा लढणारच
खासदार राजू शेट्टी यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा शड्डू  ठोकणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘मी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच निवडणुकीच्या मैदानातही लढत राहणार. लोकसभा निवडणूक हातकणंगले मतदारसंघातून मी लढणारच आहे.’’

Web Title: Raghunathdada Patil comment