उसाच्या न दिलेल्या पैशावर शेट्टी गप्प का? - रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

आमदार जयंत पाटील व खासदार राजू शेट्टी यांची मिलीभगत १० वर्षांपासून आहे. ती शेतकऱ्यांना आता कळली. 

- रघुनाथदादा पाटील

इस्लामपूर - राजारामबापू साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील ११३ रुपये व जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील एफआरपी ऊस गाळपाला दोन महिने उलटले तरी दिलेली नाही. त्यावर खासदार राजू शेट्टी गप्प का? असा सवाल  शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी  येथे केला. आमदार जयंत पाटील व खासदार राजू शेट्टी यांची मिलीभगत १० वर्षांपासून आहे. ती शेतकऱ्यांना आता कळली, असेही ते म्हणाले.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी २८ डिसेंबरला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या संदर्भात माहिती देताना ते म्हणाले,‘‘मी दहा  वर्षांपासून आमदार जयंत पाटील व खासदार शेट्टी एकत्र असल्याचे ओरडून सांगत होतो. ते आता बाहेर आल्याने लोकांना समजायला लागलेय. भाजप व काँग्रसमधील नेत्यांचे खासदार शेट्टींशी संगनमत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शेट्टींनी एफआरपीचे तुकडे केलेत. कायदा मोडला आहे. काँग्रेस व भाजपच्या नेत्यांचे कारखाने असल्याने दोन्ही पक्षांनी संघटनेच्या नेत्यांना चळवळ दडपण्यासाठी खासदार, आमदार केले. ज्यांनी बिले दिली नाहीत अशा शिवाजीराव नाईक यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी लावतात. कारवाई मात्र करत नाहीत.’’

- रघुनाथदादा पाटील 

ते म्हणाले,‘‘राज्यघटनेत शेतकरी विरुद्ध कायदे नव्हते. काँग्रेस दुरुस्ती करून कायदे झाले. वन्‍य प्राणी वाढल्‍याने व कुत्री, माकडे संपल्याने शेळ्या, मेंढ्या व अन्य जनावरांवर हल्ले होत आहेत. गोवंश हत्या बंदी कायदा झाल्याने जनावरांची संख्या वाढली. बैलांच्या शर्यती बंदी असल्याने भाकड जनावरे पाळणे परवडत नाही. कारवाई लगेच केली जाते. हे कायदे रद्दसाठी मोर्चा आहे.’’ जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, भगवानराव माने, धनपाल माळी, प्रणव पाटील उपस्थित होते.

२९ डिसेंबरला मोटारसायकल रॅली
चालू हंगामातील एफआरपी ३१ डिसेंबरच्या आत  मिळावी यासाठी २९ डिसेंबर रोजी वडगाव (ता. हातकणंगले) येथून मोटारसायकल रॅली काढणार आहे. कारखान्यांना भेटून निवेदन देऊ. पैसे वेळेत मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला.
 

Web Title: Raghunathdada Patil comment